खंबावाल्या साहेबांचे मदिरेसाठी कायपण, अधिकारी-कर्मचारी मेटाकुटीस


सामना प्रतिनिधी सिंधुदुर्ग  

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये एक साहेब भारीच कर्तृत्ववान निघाले आहेत. मात्र, त्यांची ही प्रसिद्धी ‘खंबावाला’ साहेब म्हणून परिचित झाली आहे. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून वावरणाऱ्या या अधिकाऱ्याने सर्वांकडे खंबा देण्यासाठी तगादा लावल्याने अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. या अधिकाऱ्याच्या दालनात गेल्यावर ‘हात हलवत आलास का ?’ असा प्रश्न त्याच्याकडून विचारला जात आहे. त्यामुळे या खंबावाला अधिकाऱ्याला आवर कोण घालणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषदेत अत्यंत महत्वाच्या व जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एका विभागाच्या जिल्ह्याच्या प्रमुख पदावर हा माणूस कार्यरत आहे. घाट माथ्यावरून वर्षभरापूर्वी जिल्ह्यात दाखल झालेल्या या अधिकाऱ्याने क्लास १ अधिकाऱ्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जिल्ह्याचा प्रमुख असतानाही सिगारेट विकत घेण्यासाठी हा अधिकारी जिल्हा परिषदेच्या गेटवर फिरताना दिसतो. मदिरेसाठी तर त्याने उच्छाद मांडला आहे. काहीही काम नसताना हा अधिकारी तालुका कार्यालयात जातो. तेथे गेल्यावर पहिले खंबे आणण्याचे आदेश देतो. एकाद्याने क्वार्टर आणली तर ‘हे काय तीर्थ आणलेस काय ?’ असे विचारतो. त्याला आपल्या विभागाचे काम काय चाललेय ? निधी १०० टक्के खर्च पडणार का ? यांच्याशी काही देणे-घेणे नाही.

अनेकवेळा तर हा अधिकारी ज्या शासकीय गाडीने फिरतो त्याच गाडीत बसून मदिरा प्राशन करतो. मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे हा विषय गेल्यावर त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले होते. त्यावेळी खंबाच्या मागणीची लेखी तक्रार देण्यास चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अवघ्या ३-४ महिन्यांत तो अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने अनेकांनी लेखी लिहून दिले नाही. मात्र, आता त्या अधिकाऱ्याचे खंबा प्रकरण अधिकच वाढले आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी तर जिल्हा परिषदेत येणेच बंद केलेय. मात्र, हा अधिकारी कोणाकडेही पैसे मागत नाही. कोणी पैसे दिलेतरी घेत नाही. केवळ आकडे सांगत तेवढे खंबे आणायला सांगतो. कार्यालयात येण्यापूर्वीच हा अधिकारी मदिरा प्राशन केलेला असतो. जिल्हा परिषद पदाधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे त्या विभागाचे काम कमी होताना दिसत आहे.