सरकारच्या परिपत्रकामुळे शाळा व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य शासनाच्या मराठी विद्या प्राधिकरणाने तातडीने काढलेल्या परिपत्रकामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शाळांमध्ये घेण्यात येणाऱया संकलित मूल्यमापन चाचणीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात प्राधिकरणाने ऐनवेळी बदल केला आहे. ही चाचणी उद्या म्हणजेच शनिवारी घेण्याचे आदेश जारी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बहुतांश शाळा या शनिवारी बंद असल्याने या दिवशी कोणतीच परीक्षा नव्हती. मात्र ऐनवेळी शनिवारी सुरू असलेल्या शाळांसाठी प्राधिकरणाने परिपत्रक काढले. विज्ञान विषयाची परीक्षा सहावी ते आठवीच्या सकाळच्या सत्रातील शाळांनी ८.३० ते १०.३० या कालावधीत घेण्याचे पत्रकात नमूद करण्यात आले. मात्र हे पत्रक हातात मिळेपर्यंत शुक्रवारी शाळा सुटल्या होत्या. विद्यार्थी घरी गेले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क करताना शिक्षकांच्या चांगलेच नाकीनऊ आले.