ड्रोन वापराला हिंदुस्थान सरकारची परवानगी


>>स्पायडरमॅन

Flying of Remotely Piloted Aircraft System किंवा ज्याला सध्याच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत ड्रोन्स म्हणले जाते, ती ड्रोन्स आता काही आपल्यासाठी अनोळखी राहिलेली नाहीत. विविध कार्यक्रम, एखाद्या समारंभाचे फोटोशूट अथवा व्हिडीओ शूट अशा कार्यासाठी आता ड्रोन्सचा सर्रास वापर होऊ लागला आहे. अर्थात अशा वापरासाठी योग्य परवानग्या घेण्याची आवश्यकता ही असतेच. हिंदुस्थान सरकारची याआधी ड्रोन्सच्या संदर्भात स्वतःची अशी कोणतीही नियमावली नव्हती. मात्र आता नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भात नॅशनल ड्रोन पॉलिसी तयार केली असून त्यामुळे आता 1 डिसेंबरपासून हिंदुस्थानात ड्रोन्सच्या व्यापारी वापराचा मार्ग खुला झाला आहे. सरकारने ड्रोन्सच्या देशातील खासगी वापराला डिसेंबरपासून परवानगी दिलेली असल्याने सगळय़ांचेच डोळे या नियमावलीकडे लागले होते. ड्रोन नियमावली 1.0 पूर्ण झाल्यानंतर नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने लगेच ड्रोन नियमावली 2.0 वरदेखील काम चालू केले आहे. सध्याच्या ड्रोन नियमावली 1.0 नुसार सध्या ड्रोन उड्डाणाच्या परवानगीसाठी ड्रोनच्या मालकाला आणि पायलटलादेखील नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडे नोंदणी करणे आवश्यक बनवण्यात आले आहे. पायलटसाठी ड्रोन उडवण्याची परवानगी डिजिटल स्कायच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये ड्रोन्सला फक्त 400 मीटर उंचीपर्यंत आणि तेही फक्त दिवसा उडवण्याची परवानगी मिळणार आहे. सध्या ड्रोन्सची वर्गवारी नॅनो (250 ग्रॅम), मायक्रो (250 ग्रॅम ते 2 किलो), स्मॉल 2 किलोग्रॅम ते 25 किलोग्रॅम, मीडियम 25 किलोग्रॅम ते 150 किलोग्रॅम, लार्ज 150 किलोग्रॅमपेक्षा जास्त अशी करण्यात आली आहे, तर ड्रोनच्या उड्डाणांसाठी तीन झोन ठरवून देण्यात आले आहेत. रेड झोन – इथे ड्रोन उडवण्यास बिलकूल परवानगी नसेल. यलो झोन – इथे ठरावीक मर्यादेपर्यंतच ड्रोन्स उडवायला परवानगी मिळेल. ग्रीन झोन – इथल्या उड्डाणांसाठी ऑनलाइन परवानगी सहजतेने प्राप्त करता येणार आहे.