आता एक हजारची नवी नोट येणार

मुंबई – एटीएममधून मिळालेली दोन हजारांची नोट सुटी करण्याच्या त्रासातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेली एक हजाराची नोट आता नव्या रंगरूपात चलनात येणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक हजार रुपयाच्या नव्या नोटांच्या छपाईला सुरुवात केली आहे. या नोटा जानेवारीतच चलनात येणार होत्या. मात्र ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या छपाईचे कामकाज सुरू असल्याने रिझर्व्ह बँकेला एक हजाराच्या नोटांची छपाई पुढे ढकलावी लागली. हजारची नवी नोट नेमकी कधी चलनात येईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा नोटाबंदीनंतर चलनातून बाद झाल्या. यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणल्या गेल्या. आता हजाराची नोटही चलनात येणार असल्याने नोटांचा तुटवडा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. नव्या नोटांच्या स्वरूपात आतापर्यंत ९.९२ लाख कोटी रुपये चलनात आले आहेत.