कर बुडव्यांसाठी शेवटची संधी, काळापैसा जाहीर करण्यासाठी नवी योजना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काळापैसा जमवणाऱ्यांना केंद्र सरकारने आता शेवटी संधी दिली असून संपत्ती जाहीर करण्यासाठी ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ शनिवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले. या योजनेतून जमा झालेले पैसे देशातील गरीब जनतेसाठी वापरण्यात येतील, अशी माहिती महसूल सचिव हसमूख अधिया यांनी दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतरर्गत (PMGKY) ५० टक्के कर आणि बेहिशेबी मालमत्तेवर सरचार्ज भरावा लागले. तसेच बेहिशेबी पैसा चार वर्षांसाठी या योजनेअंतर्गत सरकारच्या खात्यात बिनव्याजी स्वरुपात ठेवला जाईल.

आपली बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारने ‘[email protected]’ हा ई-मेल आयडी जारी केला आहे. या ई-मेल आयडीवर काळ्यापैशासंदर्भातील माहिती पाठवण्याचे आवाहन देखील केले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना उद्यापासून सुरू होणार असून ३१ मार्च २०१७ रोजी बंद करण्यात येईल. या योजनेअंतर्गत जे लोक काळ्यापैशाची माहिती जाहीर करतील त्यांची सर्व माहिती गोपनिय ठेवण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कर भरल्याची पावती दाखवल्यास शिल्लक रकमेवरच कर आणि दंड भरावा लागेल तसेच खटला देखील चालवला जाणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.