शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशासाठी लढताना वीरमरण पत्करलेल्या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबतचे एक पत्रक गुरूवारी प्रसिद्ध केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शाळा व कॉलेजमध्ये तसेच लष्कराच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही सवलत मिळणार आहे.

आतापर्यंत शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दर महीना दहा हजार रुपयांचा खर्च सरकार देत असे. मात्र आता सरकारकडून ही मर्यादा हटविण्यात आली आहे. शहीद जवानांसोबत बेपत्ता झालेल्या व अपंग झालेल्या जवानांच्या मुलांना देखील हा फायदा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जवानांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

जवांनाच्या मुलांवर सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादा रद्द करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. ही मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले होते.