बाबूजी, ग.दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरी होणार

सामना ऑनलाईन । नागपूर

सांस्कृतिक महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाकडून साजरे केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीत अधिकारी, कला, साहित्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश असणार आहे. २५ जुलै २०१८ ते ८ नोव्हेंबर २०१९ या काळात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत निवेदनाच्या माध्यमातून दिली.

२५ जुलै हा सुधीर फडके यांचा जन्मदिवस, तर पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिवस ८ नोव्हेंबर २०१९ रोजी येणार आहे. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर साहित्य, कला व संगीत क्षेत्राशी निगडित १०० कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. सुधीर फडके, गदिमा, पु. ल. देशपांडे यांच्याशी संबंधित चित्रपट महोत्सवाचे आयोजन, शाळा- महाविद्यालयीन स्तरावर निबंध, वक्तृत्व, एकांकिका, एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ‘भिलार’ या पुस्तकाच्या गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. तिघांच्याही आयुष्यावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून लाइट व साऊंड शो व पुस्तक प्रदर्शनाचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे. तरुण पिढीला या तीनही व्यक्तींच्या कार्याची ओळख व आवड निर्माण करण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.