पर्रीकरांना हटवले तर सरकार पडेल ना!


सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

सध्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल झालेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बदलून नवा मुख्यमंत्री नेमण्याचा प्रयत्न जरी झाला तर आमचे गोव्यातले सरकार पडेल. त्यामुळे आम्ही पर्रीकरांना काही हटवणार नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

जावडेकरांनी पत्रकारांसमोर ‘मन की बात’ केली. मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती अस्वास्थ्यायामुळे गोव्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र गोव्यातील ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी’ आणि ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ या पक्षांचा तसेच बहुतांश गोव्यातील आमदारांचा पर्रीकरांनाच पाठिंबा आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाचा पेच अधिकच चिघळला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांचा डोळा असला तरी पर्रीकरांशिवाय इतर नेत्यांचे समर्थन करायला भाजपचेच आमदार तयार नाहीत, असे जावडेकरांनी पत्रकारांना सांगितले.

गडकरींचे पंख छाटले

बहुमत नसतानाही गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात महत्त्वाची जबाबदारी बजावलेले केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गोव्याची जबाबदारी काढून घेत त्यांचे पंख छाटले आहेत. गोव्यातील राजकीय घडामोडी सध्या बी. एल. संतोष हाताळत असून, या एकंदरीत घडामोडींमुळे नितीन गडकरी अस्वस्थ असल्याचे समजते. त्यामुळे भाजपात मोठी सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे.

समस्येवर उद्या तोडगा

पर्रीकर हे दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये उपचार घेऊन परत येईपर्यंत राज्यकारभार कसा चालवायचा यावरील तोडगा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा शनिवारी रात्री उशिरा राजस्थानमधून दिल्ली येथे परतणार आहेत. त्यामुळे उद्या किंवा परवा गोव्याबाबतचा निर्णय ते जाहीर करतील, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली.