वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खड्डेमय रस्ते आणि कचखडीचे गालीचे

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी एकादशीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून दिंडया आणि पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान सुरू आहे. वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकरी भक्तांना आवश्यक त्या मूलभूत सेवासुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र विकासकामांच्या नियोजनात गती आणि सुसूत्रता नसल्याने वारकऱ्यांना खचखडीचे गालीचे आणि खड्डेमय रस्त्यांवरून चालावे लागणार आहे असे दिसते.

पंढरपूर शहरांमध्ये पावणे दोनशे कोटींची विकासकामे झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून होतो आहे. मात्र यातील बहुतांश कामे ही भाविकांना डोळ्यासमोर ठेवून न करता केवळ टक्केवारी डोळ्यासमोर ठेवून केल्याने या विकासकामांचा वारकऱ्यांना लाभ होतो आहे ना पंढरपूरकरांना आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय अशी पंढरपूरच्या विकासकामांची अवस्था आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायापालट व्हावा यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते आहे. मात्र या निधीचा विनियोग आवश्यक कामांसाठी होत नसल्याने पावणे दोनशे कोटी रुपये पंढरपूर शहरात खर्ची पडूनही देखील पंढरपूरचे बकालपण जाण्याऐवजी त्यात अधिकची वाढच झाल्याचे चित्र सध्या दिसून येते.

पंढरपूरातील दोन रस्ते सोडले तर इतर सर्व रस्त्यांची अवस्था खेडयातील रस्त्यांसारखीच असल्याचे जाणवते. शहरातील रस्ते चकाचक असावेत यासाठी राज्य शासनाने सुमारे चाळीस कोटी रुपये दिले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाल्यानंतर हे रस्ते कोणी करायचे यावरून सार्वजनिक बांधकाम आणि पंढरपूर नगर परिषदेत रस्सीखेच सुरू होती.

शेवटी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले आणि रस्त्यांची विभागणी करून दोघांत कामे वाटून दिली आहेत. भाई राऊळ यांचा पुतळा ते टाकळी रोड, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक ते राजमाता अहिल्यादेवी चौक, पत्रकार नगर ते मध्यप्रदेश भवन, संतपेठ ते गोपाळपूर रोड आदी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधी येऊन दोन वर्षे झाली पण टक्केवारीच्या वाटाघाटीमुळे कामांना मुहूर्त लागला नाही.

रस्त्यांचा निधी परत जाण्याची वेळ आल्यानंतर लगबगीने कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. श्री विठ्ठल मंदिर, चंद्रभागा नदी, रेल्वे स्टेशन आणि एस टी बसस्थानक या मार्गावरचे हे रस्ते आहेत. गेल्या सहा महिन्यापासून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांना गती नसल्याने आषाढी वारी पूर्वी हे रस्ते होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेने सांगून टाकले आहे.

सुरू असलेल्या या रस्त्यांची कामे उरकण्यावर सध्या या दोन्ही संस्थांचा भर असून बहुतांश रस्त्यांवर मुरूम आणि काही रस्त्यांवर डांबरीकरणाचा एक हात मारून रस्ते केले जात आहेत. या नव्या रस्त्यांवर सर्वत्र कचखडी पसरलेली आहे. वारकरी भाविक अनवाणी पायांनी या परिसरात फिरत असतात या कचखाडीमुळे त्यांचे पाय रक्तबंबाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.