सरकारी विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

एलआयसी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स यासह पाच सरकारी विमा कंपन्यांच्या शेअर बाजारात नोंदणीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे विमा कंपन्यांना शेअर बाजारातून निधी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे सरकारी कंपन्यांमधल्या निरगुंतवणुकीच्या प्रक्रियेला वेग मिळण्यास मदत होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. विमा कंपन्यांना शेअर विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणे सोपे जाणार आहे. तसेच सरकारचे भागभांडवल 100 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत आणले जाईल. या निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या कामात आणखी पारदर्शकता येईल, असेही जेटली म्हणाले. दरम्यान, गेल्या वर्षी केंद्र सरकारने विमा कंपन्यांत विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

या कंपन्यांची होणार नोंदणी

शेअर बाजारात पाच सरकारी विमा कंपन्यांची नोंदणी होणार आहे. यात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एलआयसी, न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे.