पर्यावरणाच्या रक्षणासाठी मेट्रोची आरेतील कारशेड हटवणार?

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शहरातील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणांनी मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल जपण्याची कसरत सुरू ठेवली आहे. हे सगळे माहीत असूनही आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड आणून फडणवीस सरकार मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल संकटात टाकत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यापुढे हा विषय नेला आहे. त्यामुळे मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोशल नेटवर्कप्रेमी पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन देशातील प्रसारमाध्यमांना पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या याच ट्वीटला प्रतिसाद देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम होणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी आरे येथील मेट्रोची कारशेड हटवावी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकारकडून ठोस प्रयत्न व्हावेत अशी आशा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.