दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना कोण करणार; धनंजय मुंडे यांचा सवाल

सामना ऑनलाईन । जालना

दुष्काळ जाहीर केल्यानंतर उपाययोजना करण्याची जबाबदारीही सरकारची असते. राज्य सरकारने 151 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. मात्र 25 दिवस झाले तरी सरकारतर्फे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना कोण करणार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाण्याअभावी जळालेल्या फळबागा, वाळलेला ऊस यांची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा केली.

मुख्यमंत्री जागोजागी बैठका घेत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला त्यांनी कोणतेही आदेश दिलेले नाहीत. दुष्काळामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. फळबागा जगवण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. उसाच्या पिकाला आणि फळबागांना एक लाख हेक्टरी मदत मिळावी, इतर पिकांना 50 हजार हेक्टरी मदत मिळावी, शेतकऱ्यांचे वर्षभराचे वीज बिल सरकारने द्यावे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी सरकारने भरावी अशी मागणी मुंडे यांनी केली. दुष्काळ जाहीर केला म्हणजे जबाबदारी संपली असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असेही त्यांनी सरकारला सुनावले.