५० टक्के पदवीधरांना नोकऱ्या मिळवून दिल्याच पाहिजेत!

सामना प्रतिनिधी । मुंबई

पदवी घेतल्यानंतर हजारो विद्यार्थी बेरोजगार आहेत. अगदी इंजिनीअर होऊनही अनेकांना नोकऱ्या नाहीत. या परिस्थितीची विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गंभीर दखल घेतली आहे. उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण केलेल्या ५० टक्के पदवीधरांना नोकऱया किंवा स्वयंरोजगार मिळवून दिलाच पाहिजे असे ‘टार्गेट’ यूजीसीने दिले आहे.

उच्च शिक्षण संस्थांना काय लक्ष्य द्यायचे या संदर्भात आज २४ मे रोजी यूजीसीची बैठक झाली. सन २०२२ पर्यंतचा कालावधी त्यासाठी निश्चित करण्यात आला. ५० टक्के पदवीधरांना नोकऱया देणे हे त्यातील प्रमुख लक्ष्य ठेवण्यात आले. पदवीधर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी त्यांना सहकार्य करणे तसेच शिकत असतानाच दोनतृतीयांश विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जागृत करणे, उद्योग क्षेत्राशी त्यांची जवळीक निर्माण करणे असा यामागे यूजीसीचा उद्देश आहे.

यूजीसीची पंचसूत्री
प्रत्येक संस्थेने किमान पाच गावांमधील लोकांच्या विकासासाठी ज्ञानाचा वापर करावा. ७५ टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण द्यावे. अभ्यासक्रम पूर्ण करून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही संस्थेने जोडून ठेवावे. २०२२ पर्यंत ‘नॅक’चे ऑक्रिडेशन मिळवावे. शिक्षकांना अपडेट ठेवण्यासाठी वार्षिक अभ्यासक्रम ठेवावा.