५५ लाखाच्या धान्य घोटाळाप्रकरणी तीन गोडाऊन किपर अडकले

सामना प्रतिनिधी । बीड

बीड येथील शासकीय वितरण व्यवस्थेतील हजारो क्विंटल धान्य आणि साखर शासकीय गोदामातूनच गायब झाल्याच्या प्रकरणात बुधवारी रात्री गोदाम व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली. तब्बल ५५ लाख ३ हजार ५०९ रूपयांच्या या धान्य घोटाळा प्रकरणी शासन व जनतेची फसवणूक करणाऱ्या तीन गोदाम व्यवस्थापकांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान धान्य घोटाळ्यात सोयीचा अहवाल देण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पुरवठा विभागाला दणका दिला आहे.

अतुल अरविंद झेंड, संजय नारायण हांगे आणि नितीन तुकाराम जाधव अशी गुन्हा नोंद झालेल्या तत्कालीन गोदाम व्यवस्थापकांची नावे आहेत. डिसेंबर २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीतील हे प्रकरण आहे. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय वितरण व्यवस्थेतील धान्य व साखरेचा साठा ठेवण्यात आला होता. या गोदामातून तब्बल १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची तफावत असल्याचा अहवाल गोदाम व्यवस्थापकाने २० फेब्रुवारी २०१८ रोजी बीड तहसिलदारांना दिला होता. दरम्यान २ मार्च २०१८ रोजी या प्रकरणात संभाजीनगरचे पुरवठा उपायुक्तांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना बीडच्या तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नंतर २८ मार्च २०१८ रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पाच अधिकाऱ्यांचे चौकशी पथकही नेमण्यात आले होते. दरम्यान याच प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना चौकशीत सहकार्य करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी पाच लाखांची लाच घेताना एसीबीच्या कारवाईत रंगेहाथ पकडले होते. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मोठ्या कारवाईनंतर पुरवठा विभागातील सावळा गोंधळही समोर आला होता. असे असतानाच बीडचे नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना धान्य अपहार प्रकरणाच्या चौकशी अहवालाचे अवलोकन करण्याचे आदेश दिले होते. तर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाने संयुक्त चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना सादर केला. त्यात तत्कालीन तीन गोदाम व्यवस्थापकांनी एकाच परमीटवर अनेकवेळा धान्य उचलून मोठा अपहार केल्याचे समोर आले.

त्यानंतर बुधवारी (दि.१३) पुरवठा अधिकारी गवळी यांनी ग्रामिण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. मुळ परमिटचा एकापेक्षा अनेकवेळा वापर करून तसेच नियमानुसार कारवाई न करता शासकीय धान्य गोदाम कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील ५५ लाख ३ हजार ५०९ रूपये किंमतीच्या धान्य व साखरेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. बनावट नोंदी करून अपहार उघडकीस येवू नये म्हणून रेकॉर्ड नष्ट करून शासकीय वितरण प्रणालीच्या धान्याची परस्पर विल्हेवाट लावली, असे या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे. याबाबत बीड ग्रामिणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून सुमारे ५५ लाखांचा अपहार झाल्याची तक्रार आहे. तपासानंतर इतर माहिती पुढे येईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

पुवठा अधिकाऱ्यांनी दिली तक्रार
धान्य अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी हे मंगळवारीच बीड ग्रामिण ठाण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे वेळ लागला. त्यामुळे बुधवारी दुपारनंतर ते पुन्हा ग्रामिण ठाण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ते तक्रार ठाण्यात थांबले होते. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार संभाजी मंदे हेही हजर होते.

बी.एम.कांबळेंना हेच प्रकरण भोवले
अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्याकडे या धान्य घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी कारवाई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी या प्रकरणात अडकलेल्या लोकांना सोडवता कसे येईल? यासाठी प्रयत्न सुरू केले आणि चौकशीमध्ये निर्दोष ठरवण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच घेताना ते पकडले गेले. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या तोंडचा घास काढून काळ्या बाजारात धान्य विक्रीसाठी मदत करणाऱ्या गोडाऊन किपरला सहीसलामत सोडवण्याचा प्रयत्न कांबळे यांच्या चांगलाच अंगट आला.

आस्तिककुमारांनी घेतला धाडसी निर्णय
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी या घोटाळ्याप्रकरणी आळीमिळीची भूमिका घेतली होती. यात दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी पुन्हा चौकशीचा फार्स केला होता. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याचेच आदेश दिले. या प्रकरणात कोणालाही माफी नाही अशी भूमिका घेत त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे ५५ लाख रूपयांचा धान्य घोटाळा करणाऱ्या गोडाऊन किपरवर गुन्हा दाखल झाला आहे.