उरणमध्ये युवासेनेचा महाआरोग्य यज्ञ

15

सामना प्रतिनिधी । कर्जत/उरण

गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी युवासेनेने कर्जत व उरणमधील जेएनपीटी टाऊनशीपमध्ये बुधवारी आयोजित केलेल्या महाआरोग्य यज्ञास हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही तालुक्यांत तब्बल दोन हजार रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केली. शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित राहून रुग्णांची विचारपूस केली, उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच तरुणांशी संवादही साधला.

15 जणांवर मोफत शस्त्रक्रिया
युवासेनेने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या गरीब रुग्णांवर युवासेनेच्या वतीने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

नाक-कान-घसा, ब्लडप्रेशर, हृदयरोग, मधुमेह याची तपासणी डॉक्टरांनी केली. तसेच अनेकांना औषधेही देण्यात आली. कर्जतमधील रॉयल गार्डन येथे झालेल्या आरोग्य शिबिरात 24 तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. त्यात स्त्रीरोग तज्ञांचाही समावेश होता. 1 हजार 30 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रुग्ण तसेच डॉक्टरांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान उरणमधील जेएनपीटी टाऊनशीपमध्येही युवासेनेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. तेथे 850 रुग्णांची तपासणी झाली. अपोलो रुग्णालय, डी.वाय. पाटील हॉस्पिटल तसेच उरण मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांच्या टीमने यात भाग घेतला.

जेएनपीटी येथील आरोग्य शिबिराच्या वेळी खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जेएनपीटीचे ट्रस्टी दिनेश पाटील यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, तर कर्जत येथील शिबिराच्या वेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, युवासेना अधिकारी मयूर जोशी, तालुका संघटक संभाजी जगताप, राजेश जाधव, विधानसभा संघटक संदीप बडेकर, प्रथमेश मोरे, भाई गायकर, अमर मिसळ, संपत हडप, रेखा ठाकरे, नगरसेवक सुवर्णा जोशी, अरुणा वायकर, मुकेश पाटील, संतोष पाटील, मनोहर थोरवे, रोहिदास मोरे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या