एक लडिवाळ नातं

आपल्या घरातील छोट्या मुलांना आजी-आजोबांचे प्रेम मिळणे हे खरोखरच फार भाग्याचं असतं. ते एक कधीही न तुटणारं रेशीम नातं असतं.

जोबा-आजी आणि त्यांची नातवंडं. कोणालाही हेवा वाटायला लावणारं हे नातं. नातवंडांच्या कोंडाळ्यात बसलेली आजी. नातवंडांना गोष्टी सांगणारी आजी. हे आजकाल फार कमी दिसते. कारण हल्ली चौकोनी कुटुंबात पाचव्या व्यक्तीला स्थानच नसतं. घरात नवरा-बायको दोघेही कमावते असले की त्यांना आजी-आजोबांची गरज पडते ती त्यांच्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी. कोणातरी परक्या व्यक्तीला मोल देऊन मुलांकडे लक्ष ठेवण्यास ठेवण्यापेक्षा पालकांना हा पर्याय योग्य वाटतो. त्यामुळे आई-वडिलांपेक्षा त्यांना आजी-आजोबा जवळचे वाटू लागतात. आपली काळजी घेणाऱ्या या व्यक्ती त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहतात.

नातवंडांच्या सर्व लौकिक जबाबदाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्या असतात. आजी, आजोबांचे काम त्यांच्यावर निर्भेळ माया करणे एवढेच असते. म्हणून आईवडिलांच्या शिस्तीच्या बडग्यापेक्षा आपल्यावर निखळ प्रेम करणारे आजीआजोबा त्यांना हवेहवेसे वाटायला लागतात. आपले लाड पुरवणारे आपले आजी-आजोबाच आहेत असा त्यांचा पक्का समज असतो. आपला हिरमुसलेला चेहरा आपल्या आजी-आजोबांना चालणार नाही असा त्यांचा समज असतो आणि त्यातून आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्यात एक बॉण्डिंग तयार होते. नातवंडाला लागलेली वाईट सवय आजी-आजोबांच्या प्रेमळ समजावणीने दूर होते. ही समजावणी ही आजी-आजोबांची खासियत असते.

तारुण्यात प्रवेश केलेल्या नातवंडांना आपली गुपितं सांगण्यासाठी आजी-आजोबांशिवाय दुसरे योग्य ठिकाण नसते. आपल्या मनाप्रमाणे करून घेण्यासाठी आजी-आजोबाच आईवडिलांना मार्गदर्शन करतील असा त्यांना दिलासा असतो. आजी-आजोबा ही आपल्या मुलांच्या वाट्याला आलेली संकटं, अडचणी आपल्या नातवंडाच्या वाट्याला येऊ नये म्हणून सजग असतात. आपल्या मुलांना जे आपल्याला देता आले नाही ते आपल्या नातवंडाना मिळावे यासाठी त्यांचा आटापिटा असतो. ही आजी आजोबांची मानसिकता लक्षात घेऊन नातवंडेही त्यांच्याकडून आपले सर्व हट्ट पुरवून घेतात.

दुधावरची साय
आजी-आजोबांच्या दृष्टीने हे नातं दुधावरची साय जपण्याइतके महत्त्वाचे असते. कारण त्यांनी मुलांना वाढवताना शिस्तीचे धडे दिलेले असतात. त्यांचे लाड करताना ते लाड फाजील असू नये म्हणून काळजी घेतलेली असते. फाजील लाडाने आपली मुलं बिघडतील, त्यांना शिस्त लावली नाही तर लोक आपल्याला नाव ठेवतील ही भीती त्यांच्या मनात सतत वाटत असे. तसेच मुलांच्या योग्य शिक्षणाची जबाबदारी ही आई-वडील या नात्याने त्यांच्यावरच असे. त्यांच्या मुलांना व्यवस्थित वळण लावणं, त्यांना त्यांचे भावी जीवन सुखाने जगता कसे येईल, याचीच त्यांना जास्त चिंता असते. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला बंधन असते. आपल्या पालकत्त्वाला कोणी नाव ठेवू नये यासाठी त्यांना सतर्क रहाणे भाग पडायचे. परंतु आता त्यांची पालकत्त्वाची जबाबदारी संपलेली असते. मुलांनी आपापल्या वाटा शोधलेल्या असतात. आजी-आजी संसार चक्रातून थोडीफार सुटवंग झालेले असतात. नातवंड ही त्यांची सुखाची ठेव असते.