गुकेश डोम्माराजू विश्वनाथनच्या मार्गावर; वर्षअखेरीस जगज्जेत्या डिंग लिरेनशी भिडण्याची संधी

हिंदुस्थानचा 17 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेश डोम्माराजूने हिंदुस्थानी बुद्धिबळ जगतासाठी अभिमानाने मान उंचावणारी कामगिरी करताना विश्वनाथन आनंदच्या विक्रमालाही मागे टाकले. आता वर्षअखेरीस जगज्जेता चीनच्या डिंग लिरेनशी त्याची गाठ पडेल. सुपर फॉर्मात असलेला गुकेश बुद्धिबळाचा विश्वनाथ होण्याच्या मार्गावर असून तो वर्षाचा शेवटही भन्नाट करेल, असा सर्वांना विश्वास आहे. विश्वनाथन आनंदने 22 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकल्यानंतर जगज्जेतेपदाचा मानही मिळवला होता.

गुकेशने आज हिंदुस्थानी बुद्धिबळासाठी अनेक विक्रम रचले. विक्रमादित्य गॅरी कास्पारोव्ह यांनी वयाच्या 20 व्या वर्षी जो पराक्रम केला होता तो गुकेशने वयाच्या सतराव्या वर्षीच साकारत नवा इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारा गुकेश विश्वनाथन आनंदनंतर पहिलाच बुद्धिबळपटू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदने 25 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. 1994-95 साली आनंद या स्पर्धेचा विजेता ठरला होता. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनंतर 2014 साली आनंद दुसऱयांदा विजेता ठरला. आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या गुकेशला हे यश मिळवता आले आहे. सर्वात तरुण विजेता ठरल्यानंतर गुकेशला सर्वात तरुण जगज्जेता होण्याचीही संधी आहे. चीनच्या डिंग लिरेनवर मात करून गुकेश हा पराक्रमही रचेल, अशा शुभेच्छा आतापासून हिंदुस्थानी क्रीडाप्रेमी देऊ लागले आहेत.

गुकेशने अव्वल स्थान संपादल्यानंतर कारूआना, नेपोम्नियाच्ची व नाकामूरा यांनी प्रत्येकी 8.5 गुणांची कमाई करीत स्पर्धेत संयुक्तपणे दुसरे स्थान मिळविले. हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंद 7 गुणांसह सातव्या स्थानी राहिला. त्याने अखेरच्या लढतीत अझरबैजानच्या निजात अबासोवला हरविले.

विजयानंतर गुकेश म्हणाला की, ‘खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांच्यातील लढत बघितली.  त्यानंतर मी ग्रेगॉर्ज गजेवस्की या दुसऱया खेळाडूंशीही बोललो. या सर्व गोष्टींचा मला अंतिम लढतीत खूप फायदा झाला.’ ही स्पर्धा जिंकल्यामुळे गुकेशने 88,500 युरो (अंदाजे 78.5 लाख रुपये) रोख बक्षीसही जिंकले. या स्पर्धेत एकूण 5 लाख युरोंची बक्षिसे देण्यात आली.

गुकेश तुझं अभिनंदन!

विश्वनाथन आनंदने एक्सवर पोस्ट करीत डी. गुकेशचं अभिनंदन केलं. त्याने लिहिले की ‘सर्वात तरुण चॅलेंजर बनल्याबद्दल डी. गुकेशचे अभिनंदन. तू जे काही साध्य केले, त्याचा अभिमान वाटतो. तू ज्या प्रकारे खेळलास आणि कठीण प्रसंग हाताळलेस, त्याबद्दल मला वैयक्तिकरीत्या खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा भरपूर आनंद घे.’

आशियाई क्रीडा स्पर्धेतही जिंकले होते रौप्य

गुकेशने गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 2015 मध्ये गुकेश आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 9 वर्षांखालील गटाचे विजेतेपद जिंकून मास्टर बनला. गुकेशने आतापर्यंत 5 सुवर्ण आशियाई युवा स्पर्धा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये तो हिंदुस्थानचा सर्वात तरुण आणि जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टर बनला होता.

वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळतोय गुकेश

गुकेश डोम्माराजू असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहे आणि तो चेन्नईमध्ये होम चेस टयूटर आहे. यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले.