निरक्षर आजीची चार नातींच्या शिक्षणासाठी धडपड

सामना ऑनलाईन । रोहा

रायगडमधील रोहा तालुक्यातील संतोषनगर या कातकरी आदिवासी पाडय़ातील बेबी पवार यांचे घर… घर कसले मोडकी झोपडी… घरात अठराविश्व दारिद्रय. वीज नाही, पाणी नाही. दोनवेळचे पोटभर अन्नही नाही, पण या झोपडीत चिमणीच्या उजेडात चार चिमुकल्या मुली अभ्यासाचे धडे गिरवत आहेत ते केवळ त्यांच्या बेबी आजीच्या जिद्दीमुळे. स्वतः निरक्षर असले तरी आपण आपल्या चारही नातींना शिकवून मोठय़ा ऑफिसर मॅडम बनवणारच… असा वसा या बेबी आजीने घेतला असून त्यासाठी हवी ती मेहनत त्या घेत आहेत.

वंशाला दिवा हवा या हव्यासापोटी पदरात चारही मुली पडल्या म्हणून मोठय़ा लेकीने करिश्मा व करीना या आपल्या दोन मुलींना सहा वर्षांपूर्वी कायमचे आजोळी धाडले, तर आधार हरपल्यामुळे दुसरी लेक दोन मुलींसह माहेरी आसऱ्याला आली. आधीच घरामध्ये अठराविश्व दारिद्रय़… त्यात कर्ता पुरुष कुणीच नाहीच… पण बेबी पवार यांनी हिंमत सोडली नाही. निरक्षर असूनदेखील शिक्षणाने आयुष्य बदलू शकते यावर त्यांचा विश्वास आहे, म्हणूनच आपल्या चारही नातींना त्या शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत. दररोज मोलमजुरी करून, त्या घरगाडा हाकत आहेत, पण मुलींना शाळेत रोज पाठवत आहेत. घरात कोणीही कमावणारे नाही. चार नाती व आपली विधवा मुलगी अशा पाच जणी या घरात राहतात. त्यांचा सांभाळ करण्याची सर्वस्व जबाबदारी बेबी कातकारांनी घेतली आहे. त्या चार मुलींना त्या कधीही त्यांच्या आई-वडिलांची उणीक भासू देत नाहीत. आपल्या नाती शिकाव्यात, मोठय़ा व्हाव्यात व आपल्या पायावर उभ्या राहाव्यात हेच स्वप्न या आजीचे आहे. इतकेच नव्हे तर मुलगाच वंशाचा दिवा नसतो तर मुलीदेखील शिक्षण घेऊन नाक मोठे करू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

आजीच्या नातीही हुशार
आपल्या शिक्षणासाठी आजी करत असलेल्या धडपडीची जाणीव या चारही नातींना आहे. त्या संतोषनगर येथील शाळेत शिक्षण घेत असून त्या अभ्यासातही हुशार असल्याचे शिक्षक गजानन जाधव व मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी यांनी सांगितले. खरं तर बेबी पकार हे येथील कातकरीच नव्हे तर इतर समाजासाठीही आदर्श असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.