ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे आज ९२ व्या वर्षांत पर्दापण

सामना ऑनलाईन । मुंबई

माझं हसणं माझ्या हातात आहे. दुसरा कुणी येईल आणि मला हसवेल या भ्रमात मी कधी राहत नाही. ओशो रजनीशांनी म्हटलंय, मी तुम्हाला सांत्वन देऊ शकत नाही, हवं असेल तर सत्य देऊ शकेन. हे सत्यच माझं जीवन आहे… संगीतातील ‘देवमाणूस’ यशवंत देव जीवनाचे मर्म उलगडू लागले. आज १ नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षात देवकाका पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने नेहमी ‘हसत रहा आणि अवघ्या श्वासाचा सूर करा’, असा कानमंत्र त्यांनी तमाम शिष्यांना आणि चाहत्यांना आज दिला. मराठी भावगीतांची परंपरा समृद्ध करणाऱया यशवंत देव यांनी वाढदिवसानिमीत्त दैनिक ‘सामना’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीतील सुरेल आठवणींचा गोफ गुंफला.

आजकाल पूर्वीची गाणी कुणाला म्हणावीशी वाटत नाहीत. सतत ढॅण्ड ढॅण्ड करणारे संगीत लागतं. पण मला मात्र या वयात संथ लयीचे गाणं करायचंय आणि ते मी नक्की करणार! ९२ व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा हा निर्धारच जणू!

संगीत हाच धर्म मानून जगणारा अस्सल कलावंत, कधी आपल्या साथीदारांच्या स्मृतींनी हळवा होणारा सहृदयी मित्र, ओशोची शिकवण आचरणात आणणारा शिष्य तर कधी सुगम संगीताच्या कार्यशाळेत शास्त्र्ााsक्त शिक्षण देणारे गुरू…. यशवंत देवांची अशी विविध रूपे दैनिक ‘सामना’ ला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून समोर आली.

‘हल्ली मी मागे वळून बघत नाही… मान दुखते ना माझी…’ अशी नर्मविनोदी टिप्पणी करत देवकाकांनी मुलाखतीला सुरुवात केली. ते म्हणाले, तसा मी एकदम फिट आहे. काळजी करू नका. काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळी माझ्यावर नितांत प्रेम करणाऱया व्यक्ती मदतीला धावल्या. त्यांच्या प्रेमामुळेच तरलो. हल्ली वयामुळे फारसे लक्षात राहत नाही म्हणून हा सारा अनुभव मी लिहून ठेवलाय. अगदी हॉस्पिटलमध्ये गाणी रचली तीही विनोदी. देवकाकांनी हॉस्पिटलच्या दिवसांबद्दलचे लेखन खणखणीत आवाजात वाचूनही दाखवलं.

त्यानंतर देववाणी बरसू लागली. ते म्हणाले, चाली लावाव्या लागत नाहीत. गाणं समोर आलं की तेच मला सांगतं तुम्ही मला म्हणा. शब्दामध्ये अर्थ असतो, तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे. कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो. चांगल्या शब्दांच्या शोधात हयात घालवलेल्या आणि म्हणूनच शब्दप्रधान गायकीचे प्रणेते ठरलेल्या देवांनी अवीट गोडीच्या चालींचे रहस्य उलगडले.

चिंतनशील कलावंत असलेले यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत, तसेच ते उत्तम गायक आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ कवीसुद्धा आहेत. फार मोठय़ा समृद्ध सांगीतिक कालखंडाचे नुसते साक्षीदार नव्हे तर एक भाग बनून राहिले आहेत. हजारो गाण्यांना त्यांनी स्वरसाज चढवून सूरनक्षत्रांचे देणे रसिकांच्या ओंजळीत रिते केले आहे. स्वत:चा हा प्रदीर्घ संगीत प्रवास समृद्ध करणाऱया गायक, गीतकार-संगीतकारांच्या आठवणींने देवकाका आज भावुक झाले. त्यांनी त्यांच्या संग्रहातील वही काढून त्यातील स्वरचित कविता वाचून आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये वासुदेव भाटकर, सुधीर फडके, प्रभाकर जोग, दशरथ पुजारी, दत्ता डावजेकर, आनंद मोडक, रवींद्र साठे, शांता शेळके, अरुण दाते, लतादीदी आणि आशा भोसले आदी मान्यवरांवरील कवितांचा समावेश आहे.

मंगेश नव्हे ‘शब्देश’ पाडगावकर
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना, ‘मागे उभा शब्देश, पुढे उभा शब्देश; उभा माझ्या सुरांत सदा त्याचा आवेश’ या ओळी देवकाकांनी वाचून दाखवल्या. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ या गीताच्या चालीवरून पाडगावकरांसोबत झालेले मतभेद आणि त्यानंतर मनोमिलन त्यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत कथन केले.

हल्ली ‘भाव’ मिळतं असेच संगीत होते
हल्ली भावगीतं फारशी होत नाही. भावसंगीताची परंपरा खंडित झालेय का, या प्रश्नावर यशंवत देव म्हणाले, भावगीतं होतात ना… हल्ली भाव (प्रसिद्धी, पैसा) मिळतं असेच संगीत होते. हा व्यवसायाचा अपमान आहे. मी कुणाला दोष देत नाही. शेवटी काय करायचे आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.

हिंमत ही आशाबाईंची ताकद
– आशा भोसले यांच्याबद्दलची आठवण सांगताना देवकाका म्हणाले, एकदा आशाबाईंनी मला प्रश्न केला तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की दीदींचा? मी एका क्षणात उत्तर दिले, दीदींचा. त्यावर आशाबाई भारावून गेल्या आणि असे का म्हणून विचारले. त्यावर मी एवढंच म्हणालो, नैसर्गिकता ही लतादीदींच्या गाण्याची ताकद आहे आणि हिंमत ही तुमच्या (आशाबाईंच्या) गाण्याची ताकद आहे.

– कन्येच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पहिला गाण्यांचा कार्यक्रम करताना आशाबाई निराश होत्या. त्या अवस्थेत त्यांनी देवकाकांना दूरध्वनी करून आपली मनोवस्था कथित केली. या स्थितीत मी कसे गाऊ, असा सवाल आशाबाईंनी केला. त्यावर देवकाकांनी त्यांना धीर दिला. ‘नाही नाही मी एकटीला, सूर आहे सोबतीला; आता त्याचाच हवाला जीवनाला’ या ओळी देवकाकांनी उत्स्फूर्तपणे आशाबाईंना ऐकवल्या आणि तुम्ही गात राहा, हा सल्ला दिल्याची आठवणही आजच्या मुलाखतीत देवकाकांनी सांगितले.