हृदयाचा प्रवास मुंबई ते चेन्नई, दोन वर्षांच्या युवानने दिले चौघांना नवजीवन

22

सामना प्रतिनिधी, मुंबई

ब्रेन टय़ुमरवरील उपचारासाठी दोन वर्षांच्या युवान प्रभूला मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती खालावून रविवारी या लहानग्याचा मृत्यू झाला. मरणानंतरही अवयवरूपाने आपल्या मुलाने अनेकांचे आयुष्य उजळून टाकावे या त्याच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार बालकांना नवजीवन मिळाले आहे. त्याच्या नेत्रदानाने दोघांचे आयुष्य प्रकाशमान होणार आहे. एका लहानग्याला जीवदान देण्यासाठी त्याचे हृदय ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून चेन्नईला रवाना झाले.

अवघ्या दोन वर्षांच्या युवानला ब्रेन टय़ुमरने ग्रासले होते. प्रकृती खालावल्याने त्याला 4 फेब्रुवारी रोजी मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. 10 फेबुवारी रोजी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. आपल्या काळजाचा तुकडाच आपल्यापासून दूर गेल्याने आईवडिलांच्या दुःखाला पारावर उरला नाही. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी अवघ्या दोन वर्षांच्या मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. या बालकाचे हृदय मुंबईहून विशेष विमानाने चेन्नईला रवाना झाले.

हृदय वेळेत चेन्नईला पोहोचविण्यासाठी मुंबईच्या ट्रफिकमधून ऍम्ब्युलन्स बाहेर काढण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी स्वीकारली. ग्रीन कॉरिडॉर तयार करून अवघ्या काही मिनिटांतच हृदय मुंबई विमानतळावर पोहोचले आणि तिथून चेन्नईला रवाना झाले. या मुलाच्या किडन्या लीलावती व ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांना, यकृत ज्युपिटर रुग्णालयात, डोळे नेत्र बँकेला दान करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या