दुधाच्या अनुदानास 15 जून पर्यंत वाढ द्या – आमदार जयदत्त क्षीरसागर

सामना प्रतिनिधी । बीड

राज्यात दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांना आधार असलेला दूध व्यवसाय वाढवा व अशा परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे 15 जून पर्यंत शासनाने दूध अनुदान मुदतीत वाढ करावी, अशी मागणी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील दूध उत्पादकांना 2 ऑगस्ट 2018 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत रूपये 5 प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 31 जानेवारीपासून रूपये 3 अनुदान प्रतिलिटर देण्यात येते. याची मुदत 30 एप्रलि 2019 पर्यंत असून राज्यतील दुष्काळी परिस्थिती पाहता दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत 15 जून 2019 पर्यंत प्रति लिटर 3 रूपये अनुदान पुढे चालू ठेवण्यात यावे, यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. मोठा आधार मिळेल, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दूध अनुदान वाढीसाठी क्षीरसागर यांनी विधानसभेत देखील अनेक वेळा शेतकऱ्याच्या अडचणी मांडल्या आहेत. दूध अनुदानवाढीचा त्यांचा आग्रह सभागृहात मंजूर झाला होता. लाखो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. पाणी प्रश्न असो की शेतकऱ्यांचे प्रश्न असो, त्यांनी आग्रहाने मांडून मंजूर करून घेतले आहेत. त्यांच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.