हॉटेलमधील खाणे स्वस्त, एसी, नॉन एसी हॉटेलना फक्त ५ टक्के ‘जीएसटी’

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

देशभरातील व्यापारी आणि जनतेच्या संतापानंतर अखेर केंद्र सरकारने जीएसटीच्या जाळ्यातून काहीसा दिलासा दिला आहे. २०० वस्तूंवरील जीएसटी कराचा बोजा कमी केला असून हॉटेलमधील जेवण स्वस्त झाले आहे. एसी आणि नॉन एसी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सरसकट ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. १७८ वस्तूंवर २८ ऐवजी १८ टक्के कर लावला जाईल.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस गुवाहाटीत जीएसटी परिषद झाली. परिषदेतील निर्णयाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्व हॉटेल्सला एकच जीएसटी
– १ जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली. ०,५, १२, १८ आणि २८ टक्के अशा पाच टप्प्यांमध्ये विविध वस्तूंवर वेगवेगळी कर आकारणी केली जात आहे. ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नाष्टा, जेवण महागले. वातानुकूलीत (एसी) हॉटेलमध्ये तब्बल १८ टक्के आणि नॉनएसी हॉटेलला १२ टक्के जीएसटी वसूल केला जात होता. मात्र यापुढे एसी, नॉनएसी हॉटेल्समध्ये सरसकट पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.

– हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडीट (करामध्ये सूट) देण्याची तरतूद ठेवली होती. मात्र हॉटेलचालक ही सूट देत नव्हते. त्यामुळे आता इनपुट टॅक्स क्रेडीटची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.

– ज्या हॉटेलच्या रूमचे भाडे प्रतिदिन ७५०० रुपये आणि त्यापेक्षा जास्त आकारले जाते तेथे १८ टक्के जीएसटी असेल. मात्र येथे इनपुट टॅक्स क्रेडीट ठेवले आहे. पण ७५०० रुपयांखाली रूम भाडे असणाऱया हॉटेलात ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
‘जीएसटी’मुळे कपडय़ांसह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. याचा फटका जनतेबरोबर व्यापाऱयांनाही बसत आहे. त्यामुळे ‘जीएसटी’विरोधात गुजरातमध्ये व्यापाऱयांनी तीव्र आंदोलन केले होते. व्यापाऱयांचा हा असंतोष कायम आहे. त्याचा फटका गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने १७७ वस्तूंवरील ‘जीएसटी’ १८ टक्के केल्याचे बोलले जाते. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काँग्रेस राज्यांच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील छोटे व्यापारी नाराज आहेत, म्हणूनच करकपातीची धडपड सुरू आहे, अशी टीका केली.

२० हजार कोटींचा महसुली फटका
१७७ वस्तूंवरील ‘जीएसटी’त १० टक्के कपात केल्यामुळे केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नात वर्षाला २० हजार कोटींची तूट येईल, अशी माहिती बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दिली आहे.

सिमेंटसह ५० वस्तूंवर २८ टक्के
सिमेंट, पेंट, वॉशिंग मशीनसह लक्झरी वस्तूंवर २८ टक्के ‘जीएसटी’ कायम असल्याचे सुशीलकुमार मोदींनी सांगितले.

१७८ वस्तूंवर १८ टक्के
१७८ वस्तूंवरील २८ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के जीएसटी असेल. १७८ वस्तूंवर १० टक्के जीएसटी कपात केली आहे अशी माहिती अर्थमंत्री जेटली यांनी दिली. यामध्ये चॉकलेटस्, कॉफी, च्युइंगम, कस्टर्ड पावडर, आफटर शेव्ह, शेव्हिंग क्रीम, डिओड्रंट, फेशिअल, शॉम्पू, डिटर्जंट, सॅनिटरी वेअर, हेअर डाय, हेअर क्रीम, वॉशिंग पावडर, डिटर्जंट, रेझर्स, ब्लेडस्, कटलरी, वॉटर हिटर, गॉगल्स, रिस्ट वॉच, मेटरेस, कुकर, लेदर कपडे, केबल्स, वायर, फर्निचर, ट्रंक, सुटकेस, फॅन, इलेक्ट्रिक लॅम्प, रबर टय़ूब, मायक्रोस्कोपसह इतर वस्तूंचा समावेश आहे.

१८ ऐवजी ५ टक्के
– चटणी
– बटाटय़ाची पावडर
– राईस चिक्की
– फ्लाय सल्फर
– रिफाइंड क्रूड ऑईल
– राख
२८ वरून १२ टक्के
– गव्हाचे पीठ ग्राइंडर
– सशस्त्र वाहने

१२ ऐवजी ५ टक्के
– इडली डोसा पीठ
– खोबऱयाचा किस
-फिनिल्ड लेदर
-फिशिंग नेट
– गरम कपडे
– सुतळी

जीएसटीतून वगळले
– मासे
-नारळाची करवंटी
– पॉपकॉर्न
– सुकी भाजी, गवार