नवीन वर्षाचा पहिला दिवस!

 प्रशांत येरम

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा (शके) हा पहिला दिवस.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा (शके) हा पहिला दिवस आहे.

शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनविले. त्यांच्या मदतीने शत्रूंचा सामना केला. या विजयाच्या प्रीत्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरुषहीन आणि पराक्रमहीन बनले होते. त्यामुळे शत्रूसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्मित सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्यांचा संचार केला. पौरुष्य आणि पराक्रम जागविला आणि शत्रू पराजीत झाला, असेही म्हटले जाते.

जगात वैज्ञानिक कालगणनेच्या काळाचे नववर्ष म्हणजे वर्षप्रतिपदा अर्थात याला वर्षप्रतिपदा, गुढीपाडवा, नवसंवत्सर, संवत्सरी, चेट्रीचंद या नावांनीही ओळखले जाते. याचे नाव युगादी असून याला दक्षिण हिंदुस्थानात उगादी म्हणून संबोधले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या दर्शनी भागात वा प्रवेशद्वारी गुढी उभारतात. साधारणपणे ही गुढी उंचावर उभारली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर हिंदुस्थानी प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी तसेच तिथल्या वेगवेगळ्या रुढी-परंपरांनुसार त्या-त्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला आपण गुढीपाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस) असे म्हणतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला भल्या पहाटे ओवा, मीठ, हिंग, मिरी, साखर आणि कडुनिंबाची पाने वाटून खाण्याचा प्रघात आहे. त्यानंतर पूजा करून घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी गणपतीचे स्मरण करून पूजा करतात. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, असे म्हटले जाते.

संवत्सर फल म्हणजे काय?

संवत्सर फल म्हणजे त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होते त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती – जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते ते ऐकावे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८ व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केल्यामुळे, केली , तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.

सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. शालिवाहन शक (किंवा शालिवाहन संवत्सर) आणि इसवी सन यांत साधारणपणे ७८ वर्षांचा फरक आहे. म्हणजे शालिवाहन शक + ७८ = इसवी सन अर्थात सध्या इसवी सन २०१६ आहे तर गुढी पाडव्यानंतरचा शालिवाहन शक १९३८ होईल. मात्र,१1 जानेवारीपासून ते फाल्गुन अमावास्येपर्यंतच्या काळासाठी शालिवाहन शक + ७९ = इसवी सन आहे. प्रत्येक शालिवाहन शकाला विशिष्ट नाव असते.

चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय लाभदायक असते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने ही शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे वृक्षवल्ली टवटवीत दिसतात. गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. एकंदरीतच पाडवा हा केवळ सण नसून माणसासाठी लाभदायी दिवस आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.