गुढी सुखाची उभवी…

<< अरविंद दोडे >>

आपल्या सणांच्या कथा जितक्या कथा मनोरंजक आहेत तितक्याच त्या ज्ञानवर्धकसुद्धा आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर गुढीपाडव्याचे देता येईल. यंदाची फाल्गुन अमावस्या ही १७ मार्चला आहे. दुसऱया दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा. शालिवाहन शके १९४० सुरू होत आहे. गुढीपाडव्याचा हा शुभ दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. याच दिवसापासून चैत्र-नवरात्री आरंभ होतात. या दिवसाच्या काही पुराणकथा फार उद्बोधक आहेत.

श्रीरामाने रावणाचा वध केला विजयादशमीला, म्हणजे दसऱ्याला. प्रभू रामचंद्र सीता, लक्ष्मण, हनुमान आणि इतर मान्यवरांसह अयोध्येस आला, तो चैत्र प्रतिपदेला. तत्पूर्वी तो नंदीग्रामला भरतास भेटून, त्यास सोबत घेऊन निघाले तेव्हा भरताच्या ‘रामदूतां’नी अयोध्येस येऊन चौदा वर्षे राज्याचा ‘विश्वस्त’ म्हणून कारभार पाहणाऱया शत्रुघ्नराजास सांगितले होते. म्हणूनच शत्रुघ्नाने नगरजनांना अयोध्या सजविण्याचे आदेश दिले होते. घरोघरी विजयध्वज उभारले होते. अंगणात चित्रावली किंवा चैत्रांगण सुंदररितीने रांगोळीने सजले होते. फुलांच्या माळा लावल्या होत्या. दारांना तोरणे बांधली होती. स्त्री-पुरुष नव्या वस्त्र आणि अलंकारांनी स्वागतास सज्ज होते असे वर्णन ‘रामायणात’त वाचायला मिळते. गंमत अशी की, त्यात गुढी हा शब्द नसून ‘पौराः पताकास्ते गृहे गृहे’ असा उल्लेख आहे. पौरजनांनी घराघरावर ‘पताका’ उभारल्या होत्या. सुमारे १२७८ च्या काळात म्हाईंभट लिखित ‘लीळाचरित्रा’त प्रथमच गुढी हा शब्द आला आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.

अधर्माची अवधी तोडी ।

दोषांची लिहिली फाडी

सज्जनांकरवी गुढी

सुखाची उभवी ।।४.५२।।

पुढे बहुतेक संतकवींनी या शब्दाला आपल्या पानांवर मान दिल्याचे दिसते. गुढीची काठी बांबूची असते. ती स्वच्छ धुतात. वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र, साडी बांधतात. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधतात. त्यावर धातूचे भांडे तांब्या किंवा फुलपात्र, गडू बसवतात. जमिनीवर रांगोळी काढून गुढी पाटावर उभी ठेवतात. नंतर ती काठी उंचावर लावतात. काठीला गंध, पुष्प, अक्षतादी वाहून पूजा करतात. निरांजन लावतात. उदबत्ती दाखवून दूध, साखर, पेढा अथवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात.

संध्याकाळी सूर्यास्ताला हळदकुंकू, फुले वाहून अक्षता टाकून गुढी खाली काढतात. आप्तेष्ट आणि स्नेही सोबत्यांना नववर्षानिमित्त शुभेच्छा देतात. भगवा ध्वज लावून त्याचेही पूजन करतात. हा विजयध्वज ब्रह्मध्वज म्हणून ओळखला जातो. गुढी हे उत्तम स्वागताचे प्रतीक आहे. विविध वस्तू-खरेदी करतात.

या दिवशी पंचांगपूजन करतात. वर्षभविष्य वाचतात. व्यवसायाला सुरुवात करून नवा संकल्प, नवा प्रकल्प उभारतात. सर्वात महत्त्वाची म्हणजे सुवर्णखरेदी केल्यास उत्तरोत्तर संपत्तीत वाढ होत जाते, अशी आपली भक्तिभावना आहे.

आता राहिला मुद्दा कडुलिंबादी भक्षणाचा. ओवा, मीठ, हिंग, मिरी, गूळ किंवा साखर या पदार्थांना कडुलिंबाच्या पानांमध्ये एकत्र करून ते मिश्रण सेवन करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. हे कडू मिश्रण आरोग्यदायक असते. पित्तनाश होतो. कर्नाटक, आंध्र प्रदेशात या सणाला म्हणतात ‘उगादी’. कोकणात संबोधतात ‘संवत्सर पाडवो.’ कश्मीरात ‘नवरेह’ तर सिंध प्रांतात (पाकिस्तान) ‘चेटीचंद’ म्हणतात. शालिवाहन राजा हा मराठी होता म्हणून आपल्याला हा शक, बेशक आवडतो.

आणखी काही गोष्टी

  •  या दिवशी ब्रह्माने विश्वनिर्मिती केली.
  • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने ‘शकां’चा पराभव केला. यासाठी मातीचे हजारो पुतळे तयार करवून घेतले होते. त्यांच्यात प्राण फुंकले. ते जिवंत झाले. त्या सैन्याने याच दिवशी युद्ध करून ते जिंकले. याच राजाच्या नावाने शालिवाहन शक अजूनही तेव्हापासून सुरू आहे.
  • बारा महिन्यांत चैत्र हा पहिला. शुष्क झालेली सृष्टी, शिशिर ऋतूत (माघ आणि फाल्गुन महिन्यात) झालेली पानझड, चैत्रात नवी पालवी फुटते. वसंतऋतूचा पहिला दिवस! हा ‘प्यार का मौसम’ चक्क दोन महिने असतो.