साड्यांमधला मराठी ब्रँड… वाचा कशी जन्माला आली ‘रावी’

rashmi-patkar-journalist>> रश्मी पाटकर

लेखन, संशोधन, व्हॉईसओव्हर आर्टिस्ट आणि एक नावारूपाला आलेला तिचा साडी ब्रँड अशा चौफेर आघाड्यांवर यशस्वी घोडदौड करणाऱ्या अदिती मोघे हिच्याशी साधलेला हा संवाद...

लेखन, संशोधन, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि एका साडी ब्रँडची संकल्पनाकार अशा चारही गोष्टी कुणी एकत्र करू शकतं असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? पण हो. अशी चतुरस्त्र मुशाफिरी करणारी एक उद्यमी सध्या चांगलीच गाजतेय. तिचं नाव अदिती मोघे. कॉफी आणि बरंच काही, हम्पी, आम्ही ट्रॅव्हलकर, नक्षत्रांचे देणे अशा अनेक मराठी चित्रपट-मालिकांसाठी संशोधन, लेखन अशी कामगिरी पार पाडत तिने स्वतःचा रावी हा साडी ब्रँडही निर्माण केला आहे.

रावी या साडी ब्रँडची संकल्पनाकार आणि लेखिका म्हणून नावारूपाला आलेली अदिती मूळची वसईची. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेलं घर, आजूबाजूला निसर्ग, मोकळे रस्ते अशा वातावरणात वाढलेल्या अदितीला मोकळं जगायला, हिंडायला प्रचंड आवडतं. निसर्गाच्या सान्निध्यात वाढल्यामुळे तिच्यात सृजनशीलताही प्रचंड आहे. तिने आपल्या सृजनशीलतेला कल्पकतेची जोड दिली आणि लेखन, संशोधन सुरू केलं.

कॉफी आणि बरंच काही, हम्पी या मराठी चित्रपटांची लेखिका असलेली अदिती गेली अनेक वर्षं चित्रपट आणि मालिकांसाठी संशोधन आणि लेखनाचं काम करत आहे. नक्षत्रांचे देणे, आम्ही सारे खवय्ये, मधली सुट्टी अशी अनेक गाजलेल्या कार्यक्रमांसाठी तिने लेखनाचं काम केलं. तर, हरिश्चंद्राची फॅक्टरी, पुणे ५२ अशा चित्रपटांसाठी अभ्यासपूर्ण संशोधनही तिने केलं आहे. शाळा या चित्रपटासाठी पात्र निवड करणं असो किंवा ‘आम्ही ट्रॅव्हलकर’साठी केलेलं लेखन, तिने या दोन्ही आघाड्यांवर दर्जेदार काम करत स्वतःची ओळख निर्माण केली.

लेखिका म्हणून ती तिचे अनुभव सांगताना म्हणते की, लेखन हा सगळ्याचा पाया आहे. दिग्दर्शक हा चित्रपट किंवा मालिकारूपी जहाजाचा कप्तान असला तरीही त्याचा पाया हा लेखक असतो. पण, दुर्दैवाने लेखकाला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. पटकथा लेखन हा प्रांत आता झपाट्याने बदलतोय, तिथे पूर्वीच्या तुलनेने आता चांगले प्रयोग, प्रत्यक्ष वापरातले संवाद यायला लागले आहेत, असं निरीक्षणही अदिती नोंदवते.

मालिका आणि चित्रपटांसाठी संशोधन करताना अदितीला तिची हिंडण्याची आवड जपायला मिळाली. संपूर्ण हिंदुस्थानभर फिरत असताना तिला हिंदुस्थानच्या प्रत्येक राज्यात असलेलं वैविध्य भावलं. हवामान, अन्न, पाणी याचसोबत त्या-त्या राज्याने जपलेली लोकसंस्कृती तिने बघितली. विविध राज्यांमधली वस्त्रप्रावरणं, त्यांची निर्मिती हे सगळं जवळून बघत असताना तिला नवनिर्मितीची एक प्रेरणा मिळाली. या प्रेरणेला तिने तिच्यातल्या कल्पकतेची जोड दिली आणि जन्म झाला रावी या ब्रँडचा.

रावीची जन्मकथाही तशी रंजक आहे. कामाच्या निमित्ताने अदिती वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची. एक दिवस तिला अशा काही गरीब स्त्रिया भेटल्या ज्यांना शिवणकाम विणकाम येत होतं, पण घराच्या जबाबदारीपायी नोकरी करता येत नव्हती. अदितीही स्वतः साडीप्रेमी असल्यामुळे तिने तिला हव्या तशा साड्या शोधल्या, पण तिच्या मनासारखी साडी तिला काही सापडत नव्हती. जेव्हा या स्त्रियांची भेट झाली तेव्हा तिने तिला हव्या तशा साड्या त्यांच्याकडून बनवून घ्यायचं ठरवलं. जसजशी एक साडी बनत गेली तसतसा अदितीलाही चांगला प्रतिसाद मिळत गेला. विशेष म्हणजे त्या स्त्रियांनाही रोजगार उपलब्ध झाला.

रावीचं वैशिष्ट्य म्हणजे अदिती या साड्या घाऊक स्वरूपात तयार करत नाही. ती एकावेळी ठराविक साड्या बनवते. तसंच ऑर्डरप्रमाणेही साड्या कस्टमाइज्ड केल्या जातात. आणि या सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की अदितीने फॅशन डिझायनिंगचं कोणतंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं नाही. असं असूनही तिची कल्पकता वापरून ती गेली पाच ते सहा वर्षं हा ब्रँड चालवत आहे. लेखनाकडून साडीनिर्मितीकडे असा वेगळाच टर्न घेण्याबद्दल विचारलं असता ती सांगते की, निर्मिती करताना त्यात अमुक एकच करायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. आपण प्रत्येक जण सृजनशील असतोच. फक्त कल्पकता प्रत्यक्षात आणणं गरजेचं असतं. मला उत्तम संकल्पना राबवायला आवडतात. त्यामुळे एका ठराविक कामात मर्यादित करून घेण्यापेक्षा स्वतःला सतत एक्सप्लोअर करत राहणं मला आवडतं, असं अदितीचं म्हणणं आहे.

फॅशन जगतात रोज नवनवीन प्रयोग होत आहेत. तेव्हा यातले बदल आणि त्याचे फायदे-तोटे याविषयीही तिचे विचार खूपच स्पष्ट आणि वास्तवदर्शी आहेत. ती सांगते की, आपण जे अन्न खातो, जे कपडे घालतो, त्यांच्यामागे मेहनत करणाऱ्या हातांविषयी आपण अनभिज्ञ असतो. आज हिंदुस्थानात अनेक कारागिर आणि कलावंत असल्याने आपली संस्कृती समृद्ध झालेली आहे. पण, कलावंत किंवा कारागिराची मेहनत हा आपल्यासाठी कलाविष्कार असतो, पण त्याची ती रोजीरोटी असते. फॅशनच्या बदलत्या प्रवाहांमध्ये याच कलावंतांचा आणि कारागिरांचा सिंहाचा वाटा असतो. पण, दुर्दैवाने त्यांनाच सगळ्यात कमी मोबदला मिळतो, किंवा बऱ्याचदा मोबदलाही मिळत नाही, ओळख तर लांबची गोष्ट आहे. हे बदलायला हवं असं ती आवर्जून सांगते. जर हे कलाकार जिवंत राहिले तर त्यांची कला जिवंत राहील, असं अदितीचं म्हणणं आहे.

या गुढी पाडव्याच्या निमित्ताने ती आता अजून एका नवीन विश्वात पाऊल टाकायच्या विचारात आहे. एखाद्या लेखकाने जर कथा लिहीली असेल, तर ती कथा योग्य त्या हातात पोहोचणं, तिच्यावर प्रक्रिया होऊन ती पडद्यावर येणं ही प्रक्रिया कित्येकदा खूप मोठी असते. त्यात लेखकाच्या संयमाची कसोटी लागते. इतकं असूनही ती कथा योग्य हातात पडून तिला न्याय मिळेल याची काही खात्री देता येत नाही. म्हणून पुढील काही वर्षांत अशा लेखकांसाठी एक चांगलं नेटवर्क बनवण्याचा संकल्प अदितीने केला आहे. तिच्या या प्रवासात अर्थात रावीलाही समृद्ध करण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी देशभरात ठिकठिकाणी फिरून तिथल्या कापडनिर्मिती क्षेत्राशी जोडून घेण्याचंही अदितीने ठरवलं आहे.