यंदाच्या गुढीपाडव्याला अधिक चांगलं होण्याचा संकल्प: वैदेही-मानस

>> रश्मी पाटकर

झी युवा वाहिनीवरची फुलपाखरू ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. याचं मुख्य कारण म्हणजे त्यातली मुख्य जोडी मानस आणि वैदेही हे दोघेही सध्या मराठी युवांच्या गळ्यातला ताईत झाले आहेत. मानस म्हणजेच यशोमान आपटे आणि वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे या दोघांच्या निमित्ताने एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद…

फुलपाखरू या मालिकेचा तुमचा अनुभव कसा आहे?

हृता– खूपच छान. ही माझी दुसरी मालिका आहे. माझी पहिली मालिका होती दुर्वा. त्या मालिकेमुळे माझा चेहरा ओळखीचा झाला. आणि आता ही दुसरी मालिका. आता यात गंमत अशी आहे, की मी दुर्वा साकारत होते तेव्हा ती व्यक्तिरेखा २५ वर्षांची होती आणि मी त्यामानाने खूपच लहान होते. आणि आता वैदेही साकारताना तिच्या वयापेक्षा मी मोठी आहे. पण, अर्थात दुर्वाच्या वेळी मिस झालेलं माझं कॉलेज लाईफ मी वैदेहीच्या निमित्ताने पुन्हा अनुभवू शकतेय. मुख्य म्हणजे वैदेही सोबत मी स्वतःला खूप रिलेट करते. म्हणून माझी स्वतःची अत्यंत आवडीची ही व्यक्तिरेखा आहे.

यशोमान– मी याआधी आवाज नावाच्या मालिकेत एक छोटी भूमिका केली होती. पण, फुलपाखरू ही माझी नायक म्हणून पहिलीच मालिका आहे. मला विशेष सांगायचं असं आहे की, या मालिकेसाठी जेव्हा प्रोमो शूट झालं होतं तेव्हा मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी माझ्या मालिकेतल्या एन्ट्रीसाठी खूप मस्त योजना केली होती. त्यामुळे मला खरंतर खूप स्पेशल असल्यासारखं वाटत होतं. एकूणच सगळे कलाकार फार छान आणि सहकार्य देणारे आहेत, त्यामुळे चित्रीकरणादरम्यान मजा येते.

तुमचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला?

हृता– माझ्या अभिनय प्रवासाची थोडी गंमतच आहे. माझ्या घरी शिक्षणाला फार महत्त्व आहे. माझे बाबा इंजिनिअर. मलाही डॉक्टर व्हायचं होतं. म्हणून अकरावीला विज्ञान घेतलं. पण, बारावीनंतर मला मीडियात जायची इच्छा झाली आणि मी बीएमएमसाठी प्रवेश घेतला. रुईयाला बीएमएम करत असताना मी पुढचं पाऊल या मालिकेच्या वेशभूषा विभागात साहाय्यक म्हणून काम पाहत होते. तेव्हा मला तिथेच दुर्वा या मालिकेची विचारणा झाली. मी खरंतर ऑडिशन देताना दुय्यम भूमिकांचा विचार करत होते. पण, दुर्वाच्या नायिकेसाठी माझी निवड झाली. मग दुर्वा साकारली आणि आता वैदेही साकारत आहे. माझ्या या दोन्ही व्यक्तिरेखांना लोकप्रियता मिळतेय.

यशोमान– शाळेत असताना मला स्टेज फिअर होतं. आई मला नेहमी सांगायची की नाटकात भाग घे, पण मी घाबरायचो. पण, डहाणूकरला असताना गंमत म्हणून मी एका एकांकिकेत अभिनय केला. विशेष म्हणजे त्या कामासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं तिसरं पारितोषिक मिळालं. तेव्हा मला आत्मविश्वास वाटला आणि आवड निर्माण झाली. मग पुढची पाच वर्षं एकांकिका केल्या. त्यानंतर दोन व्यावसायिक आणि पाच प्रायोगिक नाटकंही केली. मग हळूहळू मालिका.. असा प्रवास सुरू झाला.

गुढीपाडवा कसा साजरा करणार आहात? नवीन वर्षाचा संकल्प काय?

हृता– यंदाचा गुढीपाडवा तसा कामातच जाणार आहे. पण मला वाटतं की आम्ही कलाकार खरंतर खूप लकी असतो. कारण प्रत्येक सण आम्ही शूटिंग करताना एकदा आणि प्रत्यक्ष आयुष्यात एकदा असे दोन वेळा साजरे करतो. आम्ही व्यस्त असलो तरी, प्रेक्षकांसाठी पाडव्याच्या दिवशी एक खास सरप्राईज असणार आहे. त्यादिवशी महाएपिसोडही असणार आहे, तेव्हाच एक खास भेट प्रेक्षकांना मिळेल. यंदा बिझी असेन, पण जेव्हा पाडव्याच्या दिवशी घरी असेन तेव्हा आम्ही साग्रसंगीत गुढी उभारून तिची पूजा करतो. मी दरवर्षी एक संकल्प करते. मी कचरा न फेकण्याचा एक संकल्प अगदी नेमाने पाळतेय. पण, त्याहीपेक्षा जास्त दरवर्षी माणूस म्हणून अधिक चांगलं व्हायचा प्रयत्न करते.

यशोमान– अर्थात हृता म्हणाली तसं आम्ही त्यादिवशी कामातच असू. पण, मी जेव्हा घरी असतो तेव्हा गुढीपाडव्याला बाबांसोबत गुढी उभारतो. तिची पूजा करतो. संकल्प म्हणाल तर हातातलं काम जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल. तितकं चांगलं करावं असाच माझा संकल्प आहे. कारण, मालिकेचं चित्रीकरण करण्यासाठी दिवसाचे कित्येक तास काम करावं लागतं. कधीकधी वेळेअभावी काही प्रसंग चांगले शूट होत नाहीत. म्हणूनच माझ्या हातात जितकं आहे. तितकं ते चांगलं द्यावं असा संकल्प मी करत आलो आहे.

तुम्ही साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि तुम्ही स्वतः यात काय साम्य किंवा फरक आहे?

हृता– वैदेही खूप माझ्यासारखी आहे. याआधीची व्यक्तिरेखा ही राजकारणी होती. तिचा स्वभाव आणि तिच्या आयुष्यातले प्रसंग वेगळे होते. पण, वैदेही बरीचशी माझ्यासारखी आहे. त्यामुळे ती मला खूप जवळची वाटते.

यशोमान– मानस हा खरंतर बऱ्यापैकी रोमँटिक कवी आहे. मी अजिबातच असा नाही. मानस कविता करू शकतो. मला त्या काही जमत नाहीत. तो बराच लाजाळू किंवा बुजरा आहे. पण मी स्वतः तसा नाही. आणि हो, मानसच्या तुलनेने मी जरा बरा गातो. हाहा..

तुम्हा दोघांचेही सहकलाकारांचे अनुभव कसे आहेत?

हृता– खूपच छान. एकतर सगळे समवयस्क आहोत. त्यामुळे गट्टी लवकर जमते. आणि जे मोठे आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. अभिनेत्री म्हणून समृद्ध होता येतं. माझा या आधीचा सहकलाकारांचा अनुभवही खूपच जवळचा आहे. कारण या आधीच्या मालिकेत विनय आपटे आणि अश्विनी एकबोटे यांचा सहवास मला मिळाला होता. ते दोघंही आज आपल्यात नाहीत. पण, त्यांच्यामुळे खूप शिकायला मिळालं. विशेषतः कलाकार म्हणून व्यावसायिकता कशी पाळावी, सेटवर कसं वावरावं याचं उत्तम मार्गदर्शन मला त्यांच्यामुळे मिळालं.

यशोमान– मी खरंतर खूप लकी आहे की मी एका चांगल्या टीमचा एक भाग आहे. फुलपाखरूच्या सेटवर आम्ही सगळे दंगा करत असतो. पण, कामाच्या बाबतीत सगळे एकदम गंभीर असतो. मालिकेमुळे मला खूप चांगले मित्र मिळाले आहेत. मालिकेत माझे वडिलांची भूमिका साकारणारे मनोज कोल्हटकर यांच्याकडून तर मला खूप काही शिकायला मिळतं. एखाद्या कलाकाराने कसं वागावं, एखादा प्रसंग कसा हाताळावा हे सगळं त्यांच्याकडूनच आम्ही शिकतो.