विनोदातून व्यवसायाची गुढी उभारणारे ट्रम्प तात्या…

199

vishal-dp-photo>> विशाल अहिरराव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हटलं की डोक्यात येते त्यांची शान, मानपान, ऐटीत राहणं, अगदी थोडक्यात पण महत्वाचं मुद्देसूद बोलणं… पण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यांच्याविषयीच्या चटपटीत बातम्या, त्यांचे विचित्र निर्णय यांची चर्चा होऊ लागली. त्यांच्या खासगी गोष्टी व्हायरल होऊ लागल्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाविषयी मनात उभ राहणारं चित्र अगदी बदलून गेलं. लोकं त्यांची खिल्ली उडवू लागले. आता असं चित्रविचित्र वागल्यावर मराठी माणसाच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटू शकत नाही आणि यातूनच जन्म झाला तो ट्रम्प तात्यांचा. म्हणजे त्यांना मराठी माणसानं तात्या हे दुसरं नावच देऊन टाकलं. ट्रम्प तात्या या टोपण नावाच्या जन्माची कहाणी नावा प्रमाणेच गंमतीशीर आहे. पण सगळ्यात महत्वाचा आहे तो ट्रम्प तात्यांचा प्रवास आणि मराठी तरुण पिढीला सापडलेला नवा सूर. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही या नव्या पीढीतील हटके करू पाहणाऱ्यांशी थोडी बातचित केली, तिच तुमच्यासमोर मांडत आहोत.

अमित वानखेडे पाटील
अमित वानखडे पाटील

अमित वानखडे-पाटील यवतमाळच्या आर्णी गावात राहतात. शेती हा मुख्य व्यवसाय, पण राजकीय घडामोडींवर पूर्ण लक्ष. सोशल मीडियावरून विविध हँडल सांभाळणं, प्रमोशन करणं यात त्याची बुद्धी विलक्षण. डोनाल्ड ट्रम्प शहरात जेवढे चर्चिले जातात तेवढेच गावच्या कट्ट्यावर देखील त्यांची चर्चा होते. आर्णीमध्ये देखील त्यांच्या अध्यक्षपदाची चर्चा होती. त्यावेळी लोक म्हणत होते, हा निवडूनच कसा आला… त्याला किती विरोध होता… तेव्हा आणखी एक जण म्हणला म्हसोबाला रोट बोलला, नवस बोलला म्हणून जिंकला. अमित पाटील याला गंमत वाटली आणि त्याने मोबाईलवरून एक धम्माल व्हिडीओ बनवला आणि आपल्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकला. पण काही दिवसांनी फिरून तोच व्हिडीओ त्याला अन्य ग्रूपमधून आला. अमितच्या लक्षात आलं की हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता असंच काही तरी लोकांना देत रहावं जेणेकरून लोकं त्यावर येतील, व्यक्त होतील. म्हणून त्याने मित्रांसोबत हे फेसबुक पेज सुरू केलं आणि त्याला नाव दिलं ‘ट्रम्प तात्या’.

त्यावर विनोदी व्हिडीओ, फोटो, सिनेमातील गमतीजमती टाकत गेले, सोबत ट्रम्प तात्या होतेच. मग काय लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि पेजची चर्चा वृत्तपत्र, वाहिन्यांवर होऊ लागली.

मुकुंद सोळंके
मुकुंद सोळंके

असं असलं तरी मनोरंजनापुरतं हे ठीक होतं. पण पैसे कसे कमवणार म्हणून त्याने पुण्यात आपला मित्र मुकुंद सोळंके सोबत बोलणं केलं आणि फेसबुक इन्स्टंट आर्टिकल, यूट्युब व्हिडीओ चॅनल याचं प्रशिक्षण यूट्युबवरून घेतलं. मुकुंद एमसीए करत असल्याने या क्षेत्रातील गोष्टींची जाण होती. वेब डिझायनिंग, होस्टिंग, प्रमोशन हे सारं ते शिकत गेले आणि स्वत:च्या बळावर त्यांनी एक साईट उभी केली. खासरे डॉट कॉम.

फक्त विनोदातून काही होणार नाही. लोकांना आपल्या पेजवर सतत आणयचं असेल आपल्याला काय आवडतं त्या पेक्षा लोकांना काय आवडतं, लोक काय पाहातात, काय वाचतात हे जाणून घेणं अधिक महत्वाचं हे सूत्र त्यांनी ठरवलं. बातम्या तर सारेच देतात, पण आपण त्यामगच्या अन्य गोष्टी देऊ या असा विचार केला. मराठीमध्ये अशी माहिती पटकन उलब्ध होत नाही, त्यामुळे लोक आपलं पेज वाचतील असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी इंग्रजी वेबसाईट, बातम्यांच्या वेबसाईट सतत हाताळणं सुरू ठेवलं. अमितने स्वत: इंग्रजी घेऊन एमए केलं आहे. त्यामुळे फायदा झाला. इंग्रजीतून माहिती शोधायची आणि ती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचवयाची हा दोघांचा प्रवास सुरू झाला.

लोकांचा प्रतिसाद मिळत होता. मित्रांच्यासोबतीने विविध पेजवरून देखील प्रमोशन होत होतं. यातून खासरे वेब मीडिया प्रायवेट लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन केली आहे. पण यासाठी दिवसाचे १२ ते १४ तास इंटरनेट सर्फिंग, विविध विषय वाचणं. वेगळा विचार करणं, व्हॉट्सअॅप व्हायरल गोष्टींवर लक्ष ठेवणं, एकाने विषय ठरवणं दुसऱ्यानं लिहिण. असा सगळा थकवणारा प्रवास सुरू राहिला. कारण इथे स्पर्धा आहे. कोणती गोष्ट इथे चालेल काहीच सांगता येत नाही, एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्ती चालते. तर काही गोष्टी खूप मेहनत घेऊन देखील वाचल्या जात नाहीत. त्यामुळे सतत वेगळे विषय शोधत राहणं हे या क्षेत्रातील आव्हान आहे असं ते सांगतात. करीअर म्हणून या क्षेत्राकडे नक्कीच बघचा येईल. यामुळे आर्थिक फायदा मिळतो, पण तेवढेच पैसे सातत्याने प्रमोशन, वेब होस्टींग, साईट अपडेट ठेवण्यावर खर्चही होतात. जाहिराती मिळवणं देखील एक महत्वाचं टास्क आहे. हिंदी, इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने काम करणाऱ्या मंडळींना मोठ्या कंपन्या आपल्यात सामावून घेतात त्यामुळे त्या टिकतात. अशीच मदत मराठी भाषेत काम करणाऱ्यांना मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. एखद्या मोठ्या कराराची, मदतीची त्यांना अपेक्षा आहे. मात्र अशा असंख्य अडचणींवर मात करून त्यांनी आपलं पेज, वेबसाईट यशस्वीरित्या सुरू ठेवलं आहे. त्यांच्या या हटके वाटचालीकरता ‘सामना’च्या खूप खूप शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या