‘चॉकलेट बॉय’ इमेजला स्वप्निल करणार टाटा

>>विशाल अहिरराव / गणेश पुराणिक

रामायणातील कुश किंवा कृष्णा मालिकेतीलतील कृष्ण असो. मुंबई-पुणे-मुंबईतील हृदयमर्दम असो किंवा ‘दुनियादारी’ सिनेमातील श्रेयस. ‘आमचं वेगळं आहे..’ असं म्हणत शहरी तरुणाची करिअर-कुटुंब-लग्न अशी ओढाताण धम्माल पद्धतीने मांडणारा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधला घना असो. मालिका-सिनेमा-नाटक अशा तिनही माध्यमातून जवळपास ३ दशकं वेगवेगळ्या भूमिका घेऊन झळकलेला मराठी सुपरस्टार ‘स्वप्निल जोशी’. यंदाच्या ‘गुढीपाडवा’ विशेषमध्ये स्वप्निल जोशी आपल्या भेटीला आला आहे. या मुलाखतीत मालिका-सिनेमा-नाटक, वेबसिरिज, नवे ट्रेंड्स, कलाकार याबद्दल स्वप्निल भरभरून बोलला. तर त्याचवेळी त्याच्यातला हळवा ‘बाप’ माणूसही समोर आला. ही खास मुलाखत वाचकांसाठी….

* सणांचा आनंद सगळ्यांनाच सारखा, पण आपले अभिनेते सण कसे साजरे करतात याची उत्सुकता सगळ्याच चाहत्यांना असते. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून ते कसा आनंद घेतात याचं कुतुहल असतं. स्वप्निल तुझ्या चाहत्यांनाही हाच प्रश्न आहे, तुझा गुढीपाडवा कसा असतो?

– दरवर्षी मी माझ्या घरी गुढीपाडवा साजरा करतो. आपली संस्कृती यादिवशी जपली जाते, गुढी उभारली जाते त्याची पुजा केली जाते. मी घरी माझे आई-वडील, पत्नीसोबत हा सण साजरा करतो. काहीतरी गोडधोड घरी केलं जातं. मुख्यत्वे त्यादिवशी काहीतरी काम करावं हा हेतू असतो. कारण आपण सणांचा संबध सुट्टीशी लावतो. सणांच्या दिवशी मला मात्र काहीतरी काम करावंसं वाटतं. कारण सण हे उत्सवाचे प्रतीक आहेत आणि माझ्यासाठी माझं काम हा उत्सव आहे. माझ्या कामाची गुढी मी यंदाही उभारणार आहे. हा गुढीपाडवा माझ्यासाठी स्पेशल आहे कारण या गुढीपाडव्याला मी माझ्या नवीन घरात शिफ्ट झालोय. हा नव्या घरातला पहिला पाडवा आहे. मात्र या नव्या घरातल्या पहिल्या पाडव्याला मी घरी नसणार. शुटिंगनिमित्त परदेशी असणार आहे. शो मस्ट गो ऑन. मी माझं काम करून कामाची गुढी यावर्षी उभारणार आहे. जे मला येतं त्याला वंदन करून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे.

* ‘चॉकलेट बॉय’ स्वप्निलला गोड काय आवडतं?

– मला गोड फार आवडत नाही. चॉकलेट बॉय स्वप्निलला तिखट आवडतं. तसं बघायला गेलं तर मला उकडीचे मोदक, लाडू, बासूंदी, गुलाबजाम, पुरणपोळी आवडते. मात्र मला तिखट खायला जास्त आवडतं.

* नवीन वर्षात हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स आहेत का?

– नवीन वर्षात हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स आहेत, पण नो हिंट.

* मालिका, सिनेमा, नाटक तुझी पहिली पसंती कशाला?

– कामाला! मला वाटतं प्रत्येक माध्यमाचे आपले फायदे आणि तोटे आहेत. त्या त्या माध्यमांची आपली बलस्थानं आहेत. त्यामुळे ती बलस्थानं एन्जॉय करायची असतील तर त्या-त्या माध्यमांमध्येच जावं लागतं आणि गेलं पाहिजे. त्यामुळं जो आनंद तुम्हाला थिएटर देईल तो आनंद तुम्हाला टीव्ही कधीच देणार नाही. पण टीव्ही तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो ते थिएटर कधीच करू शकणार नाही. सिनेमामध्ये जी लॉन्जेटिव्हिटी म्हणजे दीर्घायुष्य आहे ती मालिका-नाटकातून मिळत नाही. प्रत्येक माध्यमाची आपली बलस्थानं आहेत त्यामुळं मला तीनही माध्यमात काम करायला आवडतं. माझी पहिली पसंती विचारशील तर माझी पहिली पसंती ‘चांगल्या कामाला’ आहे. मीडियम कम्स लेटर… (माध्यम नंतर येतं)

* सध्या टीव्ही मालिकांचा बोलबोला आहे. त्याबददल तुला काय वाटतं?

– चांगली गोष्ट आहे. पण मुळात मला असं वाटत नाही की टीव्हीच्या मालिकांचा बोलबाला सिनेमांपेक्षा जास्त आहे. काही चित्रपटांचा बोलबाला मालिकांपेक्षा जास्त आहे, तर काही मालिकांचा बोलबाला काही सिनेमांपेक्षा जास्त आहे. खरं तर हे सापेक्ष आहे. तसं बघायला गेलं तर लोकांना काय बघायला आवडतं यावर सगळं अवलंबून आहे. पण टीव्ही मालिकांचा बोलबाला जास्त असेल तर मला आनंदच आहे. कारण, मी ही टीव्ही प्रोडक्ट आहे. मी आज सिनेमांध्ये काम करत असलो तरी मी माझ्या पूर्वार्धात बरचसं काम टीव्हीवर केलंय. त्यामुळे मला जे काही नाव, ओळख, पैसा दिलंय ते टीव्हीनं दिलंय. त्यामुळे मी टीव्हीचा सदैव ऋणी आहे. टीव्ही जर मोठा होत असेल तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणाला होऊच शकत नाही.

* तुझी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिका जबरदस्त हिट ठरली, त्यानंतर पुन्हा मालिका केल्या नाहीस, असं का?

मलाही आवडेल पुन्हा मालिकांत काम करायला. पण त्या ताकदीची ती मालिका असायला हवी. एका लग्नाची गोष्टबाबत सांगायचं तर त्या मालिकेत खूप नाविन्य होतं. इतकी मोठी ‘स्टारकास्ट’ पहिल्यांदा एकत्र आली होती. त्या मालिकेत कुणी खलनायक नव्हता, कुणी जादूचे प्रयोग करत नव्हते, कुणी सासू सुना भांडत नव्हत्या. या मालिकेत मला काय भावलं असेत तर ती मालिका मर्यादित भागांची होती. आम्ही मालिकेला सुरुवात केली तेव्हा आम्हाला सर्वांना माहीत होतं की, ही मालिका २०० भागांची असणार आहे. यातला विषय खरं मालिकेचा नव्हता. जी काही पॅरामीटर आहेत ती चुकीचे पाडून बनवलेली ही मालिका होती. त्यामुळे त्यामालिकेचं वेगळेपण त्या मालिकेचं वैशिष्ट ठरलं असं मला वाटतं. असं काहीतरी वेगळं वाट्याला आलं तर नक्की परत मालिका करेल. पण मालिका करायची हा अट्टाहास आहे म्हणून मालिक करायला नाही आवडत.

* तू ‘रिअॅलिटी शो’मध्ये झळकलास, पण रमला नाहीस, असं जाणवतं! काय आहे रिअॅलिटी?

– ‘कोण होईल मराठी करोडपती’चं विचारशील तर त्याचा सिझन संपला. खरंतर ३२ भागांचा तो शो होता आणि आम्ही ४२ शो शूट केले. त्यामुळं मी ठरल्यापेक्षा जास्त रमलो त्यामध्ये, रेटिंग वाढली, चॅनलचा टीआरपी वाढला. तो शो माझ्यासाठी ‘Life changing experience’ होता. कोणत्याही अभिनेत्या तो लाईफ चेन्जिगच असेल. कारण ज्या सीटवर अमिताभ बच्चन बसले त्या सीटवर आपण बसणे हा अत्यंत मानाचा क्षण असतो त्यात काही दुमत असूच शकत नाही.

swapnil-joshi

* ‘दुनियादारी’सारखा हिट सिनेमा दिलास, पण त्याच वेळी मराठी चित्रपटात आणखी काय असायला हव असं तुला वाटतं?

– मला असं वाटतं मराठी चित्रपटात खूप काही हवं. सध्या मराठी चित्रपटांत खूप काही होतंय. अनेक वेगळे विषय आता मराठी सिनेमांत मांडले जाताय. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांची पसंती या सिनेमांना मिळतेय. म्हणजे सैराट, फॅन्ड्री, नटसम्राट, मुंबई पुणे मुंबई, टाईमपास, दुनियादारी असे वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे चालतायेत. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि यांच सगळं श्रेय मराठी रसिक प्रेक्षकांना आहे. त्यामुळे सिनेमांत काही राहतंय असे काही नाही. मराठीत खूप काही होणार आहे आणि होत राहील. माझ्याबद्दल विचारलं तर मला एखादी ‘बायोपिक’ करावी लागेल.

* ‘दुनियादारी’नंतर चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या टिकवून ठेवण्यासाठी तू काय करतो?

– मी वेगवेगळे चांगले सिनेमे करण्याचा प्रयत्न करतोय. चाहत्यांच्या अपेक्षा दोन प्रकरच्या असतात. एक असते व्यावसायिक अपेक्षा आणि दुसरी असते अभिनेता म्हणून अपेक्षा. तर माझ्या हातात आहे की अभिनेता म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहणे. व्यावसायिक यश अपयश हे होतचं राहतं. कुठलाही सिनेमा बनवतांना असंच डोक्यात असतं की एक उत्तम सिनेमा बनवूया. कुणीच असं म्हणत नाही की एक वाईट सिनेमा बनवू. दुनियादारी आमच्या वाट्याला आला हे आमचं नशिब होतं. त्यामुळे कष्ट करणे आणि चांगलं काम करत राहणे किंवा तसा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. ते मी करतोय आणि करत राहणार.

* सिने कलाकार चित्रपट निर्माता वा दिग्दर्शक होण्याचा ट्रेंड वाढतोय. भविष्यात तुझा असा काही विचार आहे?

– सध्या तरी तसा काही विचार नाही. ज्यावेळी विचार करेल त्यावेळी नक्की करेन. मी सध्या अभिनेता म्हणून खूप खूश आहे.

* रिकामा वेळ कसा घालवतोस?

– सध्या रिकामा वेळ आणि कामाचा वेळ ‘मायरा’साठीच आहे. ती १० महिन्यांची आहे आता त्यामुळे बराचस वेळ तिच्यासाठी असतो. गेले १० महिने मी कुठे जात नाही, कुठल्या ‘अॅवॉर्ड शो’ला जात नाही. कारण आता कुठे जावसं वाटत नाही. शुटींग संपलं की थेट घरी येऊन मायराला भेटावसं वाटतं, दुसरं काही करावसं वाटत नाही. सध्याचा माझा सगळा वेळ तिचा आहे आणि उरलेल्या वेळात मी शुटींग करतोय.

* असा एखादा चित्रपट ज्यामध्ये आपण पाहिजे होतो असं वाटतं किंवा हा सिनेमा आपण पुन्हा करावा असं वाटतं…

मी पिकू सिनेमा पाहिला तेव्हा मला वाटलं की असा एखादा सिनेमा आपल्या वाट्याला आला पाहिजे. इंग्रजीत एक ‘लाला लॅन्ड’ नावाचा सिनेमा पाहिला होता, तेव्हाही वाटलं होतं असा एखादा सिनेमा आपल्या वाट्याला आला पाहिजे. मराठीत मी कट्यार पाहिला तेव्हा असं वाटलं होतं, असा सिनेमा आपल्याला मिळायला हवा. कुठलीही चांगली कलाकृती पाहिली की, मला असं वाटतं आपल्याल असं काहितरी करायला मिळायला हवं. त्यामुळे असे असंख्य सिनेमे आहेत की ज्यात मला वाटतं मला हा सिनेमा मिळायला हवा होता.

* तुझ्यातली अशी एक गोष्ट जी कोणालाच माहित नाही…

कोणाला माहीत नाही अशी गोष्ट सांगणं मलाही अवघड आहे. पण मला जुनी हिंदी गाणी ऐकयला खूप आवडतात. रफी, मुकेश यांची गाणी मी कायम ऐकतो.

* बॉलिवूडमधलं ‘रोमँटिसीझम’ स्वप्निल जोशी मराठीत आणतो, मराठीतला शाहरुख असं काही लोक म्हणतात खरं आहे का?

– मी हे खूप वेळा अनेकांकडून ऐकलंय. पण मी नम्रपणे सांगतोय की आता कुठेतरी मी स्वप्निल जोशी होऊ पाहतोय, तर आधी स्वप्निल जोशी नीट होऊ देत. शाहरूख खान खूप मोठं नाव, गुणी अभिनेता आहे. पण मी स्वप्निल जोशी म्हणून आनंदी आहे.

* ‘चॉकलेट बॉय’ची इमेज मेकओव्हर करण्याची गरज आहे, असं वाटतं?

– भूमिकेप्रमाणे ती इमेज बदलत जाते. लोकांना माझे रोमॅन्टीक सिनेमे लक्षात राहिले आहे. मी वेगळ्या प्रकारचेही सिनेमे केले आहेत. ‘लाल इश्क’ सिनेमात मी ग्रे कॅरेक्टर केलं, पण ते लोकांच्या लक्षात राहिलं नाही. चांगला अभिनय करणं माझं काम आहे. इमेज बदण्यासाठी मुद्दाम वेगळा प्रयत्न मी करणार नाही. यावर्षी मी भिकारी आणि वारस असे दोन सिनेमे करतोय. दोन्ही सिनेमात माझी चॉकलेट बॉय इमेजला बदलणारे ठरतील असं वाटतंय. आशा करतो की हे सिनेमे लोकांना आवडतील.

* अनेकजण म्हणतात की, तू कोणालाही काहीही पटवून देऊ शकतोस, त्याबद्दल काय सांगशील?

हे जर मी पटवून दिलं तर पुन्हा तेच होईल की, मी हेही पटवून दाखवलं. साधी गोष्ट आहे ज्यावेळी दोन व्यक्तींमध्ये मतभेद होतात तेव्हा त्याला मी हेच सांगतो एकतर तू मला तुझं म्हणणं पटवून दे कर किंवा मी तुला माझं म्हणणं पटवून देतो करतो. यापेक्षा तिसरा पर्याय यामध्ये नसतो. त्यामुळे लोकांना ते पटतं. मी कुठल्याही गोष्टीला विरोध करायचा म्हणून विरोध कधीच केला नाही. त्यामुळे असं झालंय की सगळ्यांना वाटू लागलं की स्वप्निल जोशी कोणालाही काहीही पटवून देऊ शकतो. मी या कॉम्प्लिमेंटबद्दल आनंदी आहे.

* मराठी सिनेसृष्टीने चरित्र सिनेमे, रोमँटिक सिनेमे दिले आहेत? ‘बाहुबली’सारखा भव्य सिनेमा अद्याप आलेला नाही, तुला काय वाटतं?

– फक्त ‘बाहुबली’ तिथे बनला म्हणून मराठीत बनवावा का तर मला याचं उत्तर नाही वाटतं. मला वाटतं प्रत्येक सिनेमाचं आपलं एक स्थान आहे. मराठी सिनेमांमध्ये चांगले विषय हातळले जातात. मराठी सिनेमे ‘लार्जर दॅन लाईफ’ नसतात. मराठी सिनेमांचा आत्मा ‘लार्जर दॅन लाईफ नाही’. मराठी सिनेमांना गोष्ट सांगायला आवडते. गोष्ट पोहोचते का ते महत्वाचं. एखादी गोष्ट प्रेक्षकांना भावली तर ती ‘बाहुबली’सारखी भव्य असले किंवा फॅन्ड्री सारखी गरीब असेल. त्यामुळे मराठी सिनेमे प्रेक्षकांना आवडताय. बाहुबली सारख्या सिनेमाचा विचार केला तर ती नुसती गोष्ट नाही तर त्यांचं आर्थिक बजेट खूप मोठं आहे. हिंदी आणि साऊथमध्ये पण पहिल्यांदा बाहुबली सारखा सिनेमा बनलाय. त्यामुळे मराठी सिनेमाची काही बलस्थानं आहेत. त्याला मोठे स्टार लागत नाहीत, ते सिनेमा सेट भव्य लागत नाहीत. मराठी सिनेमे त्यांच्या गोष्टीवर रसिकांची मनं जिंकतात.

* ‘कृष्णा’ मालिकेतून तू झळकला आणि ते वलय तू आजही टिकवून आहेस. पण त्यानंतर तू अशी एखादी भूमिका का केली नाहीस?

खरं सांगायचं तर रामायणातच रामाचा पुत्र ‘कुश’ आणि मी कृष्णा मालिकेत ‘कृष्णा’ची भूमिका केली. त्यामुळे यापेक्षा मोठी व्यक्तीरेखा आता कोणती राहिली नाही. यानंतर मी काहीही केलं असतं तर ते यापेक्षा मोठं झालं नसतं. त्यामुळे त्यानंतर पौराणिक व्यक्तीरेखेच्या आलेल्या भूमिका मी स्वीकारल्या नाहीत.

* सध्या वेबसरीजचा ट्रेंड आहे, त्याबद्दल तुला काय वाटतं? आम्हाला स्वप्निल वेब सिरिजमध्ये पाहायला मिळेल का?

मला स्वत:ला वेबसिरिज पहायला खूप आवडतात. मी इंग्रजी वेबसिरिज जास्त पाहातो टीव्हीचं हे भविष्य आहे. मलाही आवडेल अशा वेबसिरिजमध्ये काम करायला. पण तशी कोणतीही ऑफर अजून मला आलेली नाही.

* राजकारणात रस आहे का…

राजकारणाचं विचारशील तर देशाचा नागरिक म्हणून जेवढी राजकारणाची माहिती असायला हवी तेवढी माहिती मला आहे. राजकारणाची माहिती असणे गरजेचं आहे कारण त्या गोष्टींना आपल्या रोज सामोरं जावं लागतं. देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. मात्र राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला आवडेत का ? तर त्याचं उत्तर नाही.

* स्वप्निल नवीन कलाकारांकडे तू कसा बघतोस?

मला वाटतं खूप उत्तम टॅलेंट मराठीत येतंय. प्रत्येकाकडे चांगलं काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्या सगळ्यांकडे मी अत्यंत नम्रपणे पाहतो आणि त्यांच्याकडून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय.
* सध्या इंडस्ट्रीत नवीन कलाकार खूप पाहायला मिळतात, पण एखादी मालिका सिनेमातच करियर संपतं, त्यातून नवे प्रश्न उभे राहतात. त्यांना तुझा काय सांगशील?

सातत्य कुठल्याही करिअरचा खूप अमुलाग्र भाग आहे. तुम्ही काय, कसं करता यासोबत तुम्ही ते किती सातत्यानं करू शकता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे सातत्या टिकवून ठेवणं, हे आजच्या तरुणांचं काम आहे ते उत्तमपणे केलं पाहिजे. सातत्यानं काम करत राहिलं तर अनुभव वाढतो.

* प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात, पण त्यात जो टिकला तोच विजयाची गुढी उभारतो. तुझ्या जीवनात असा काळ शेअर करशील?

२००६ ते २०१० हा कालावधी माझ्या आयुष्यासाठी खूप खडतर होता. काही वैयक्तिक कारणं त्यामागे होती. पण त्याच्यावर मी मात केली यांच सगळं श्रेय परमेश्वराला जातं, माझ्या आई-वडिलांना जातं माझ्या मध्यमवर्गीय संस्कारांना जातं आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना जातं जे खंबीरपणे माझ्या पाठिशी उभे राहिले. चढ उतार कुणालाही चुकले नाहीत. खूप सुंदर म्हण आहे, आयुष्यात लढा लढताना धारातीर्थी पडणं हे तुमचं अपयश नाही तर पुन्हा उठण्याची उमेद गमावणं हे अपयश आहे. तरी ती उमेद टिकवण्याची, सतत लढण्याची गुढी उभारली तर अपयशही तुम्हाला घाबरेल.

* तुझी मुलगी मायरा हिच्यासोबत तुझे क्षण कसे असतात?

मायरासोबतचे सगणे क्षण अविस्मरणीय. मुला-मुलीच्या जन्मासोबत आई-वडिलांचा जन्म होतो. त्यामुळे माझ्यातला बाबा ११ महिन्यांचा आहे. मीही वडील म्हणून रांगायला शिकतोय.

* मनोरंजन क्षेत्रात मराठीची गुढी सगळ्यात उंच असावी म्हणून या क्षेत्रात काय करता येईल, कलाकार काय करू शकतील?

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहितरी देणं लागतो. ही बांधिलकी प्रत्येक कलाकारानं जपली पाहिजे. मराठीत अनेक कलाकार ही आपली जबाबदारी पाळताय. नाना सर, मकरंद सर, पाणी फाउंडेशनसाठी काम करणारे सगळे कलाकार आपली बांधिलकी जपताय. मी स्वत: देखील सामाजिक संस्थांसोबत काम करतो. मराठीमध्ये ही जाण प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठी कलाकार इतर कलाकारांपेक्षा वेगळा दिसतो. माझ्या माहितीतले अनेक छोट-मोठे कलाकार आहेत जे आपल्या परीने समाजासाठी काम करतात. त्यामुळे मराठी कलाकारांचा मला फार अभिमान वाटतो.

* नवीन वर्षासाठी काही संकल्प…

येणाऱ्या वर्षात मायराला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करेल. जे काम आता करतोय ते काम लोकांच्या पसंतीला उतरेल असा प्रयत्न करत राहील. तसेच मागच्या वर्षी जेवढा होतो त्यापेक्षा जास्त समाधानी राहण्याच प्रयत्न करत राहील. कारण यश, पैसा आणि समाधान या तीन पूर्णत: वेगळ्या गोष्टी आहेत.

* सामनाच्या वाचकांसाठी…

‘सामना’च्या सर्व वाचकांसह, जगभरातील सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचे जावो!

  • Rajesh Dongre

    Swapnil tula pan GudiPadawyachya Hardik Shubhechha!