‘बघून घेईन’ची धमकी हा गुन्हा नव्हे!

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

दोन माणसांचे कडाक्याचे भांडण झाले की दोघेही एकमेकांना राग देतात. ‘बघून घेईन तुला’ अशीही रागपट्टी एकजण आळवतो. रागाच्या भरात हे बोलले जाते. आपण काय बोललो हे भानावर आल्यावर आपल्याला जेव्हा समजते तेव्हा घाबरगुंडी उडते. पण असे बोलणाऱयांनी आता घाबरण्याचे कारण नाही. कारण ‘तुला बघूनच घेतो’ असे बोलणे याला गुन्हेगारी धमकी मानण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मी तुला बघून घेईन (मैं तुझे देख लुंगा), तुला कोर्टात खेचीन अशी धमकी साबरकंठा जिल्हय़ातील वकील मोहम्मद मोहसिन छालोसिया यांनी 2017 मध्ये पोलिसांना दिली होती. याप्रकरणी निकाल देताना न्यायाधीश ए. एस. सुपेहिया यांनी वरील अभिप्राय दिला.पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱयास डय़ुटी करू न दिल्यावरून गुन्हा नोंदवला. याला वकील मोहम्मद यांनी हायकोर्टात आव्हान दिले. शेवटी मोहम्मद यांच्या बाजूने निकाल लागला.

कोणाला बघून घेईन ही धमकी नाही. पीडित व्यक्तीच्या मनात भीती तयार होते ती धमकी असते. या केसमध्ये अशी कोणतीही बाब समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणात अधिकाऱयांना दिलेली धमकी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे असे मानता येणार नाही, असेही मत न्यायाधीश ए. एस. सुपेहिया यांनी नोंदवले. शिवाय वकील मोहम्मद यांच्याविरुद्ध पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर गुन्हाही रद्द केला.