भाजप खासदारावर गायीचा हल्ला; आयसीयूत उपचार सुरू

सामना ऑनलाईन । गांधीनगर

गोरक्षण आणि गोवंशहत्याबंदीचे सरकारकडून समर्थन करण्यात येत असतानाच गुजरातमध्ये भटक्या गायीच्या हल्ल्यात भाजप खासदार गंभीर जखमी झाले आहेत. लीलाधर वाघेला (८३) असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या गुजरात प्रशासनाने शहरातील भटक्या गायी पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

वाघेला यांच्यावर शनिवारी एका गायीने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन बरगड्या तुटल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. वाघेला गांधीनगरमधील आपल्या घराबाहेर फिरत होते. भटक्या गायींना देण्यासाठी त्यांनी काही चपात्या सोबत घेतल्या होत्या. त्यांनी काही गायींना चपात्या द्यायला सुरुवात केली. त्यावेळी एका गायीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर प्रशासनाने शहरातील भटक्या गायी पकडण्याची मोहीम सुरू केली. शनिवारी ४४ गायी पकडण्यात आल्या असून इतर गायीही लवकरच पकडण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गांधीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गाय, बकरी, म्हैस, घोडा पाळण्यावर बंदी आहे. हे प्राणी पाळलेले आढळल्यास कारवाई करण्यात येते. असे असूनही गांधीनगरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भटक्या गायी कशा आल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.