Vayu Cyclone : महाराष्ट्र ‘सुखरूप’ पण गुजरातच्या दिशेने सुसाट वेगाने वारे

97

सामना ऑनलाईन । अहमदाबाद / मुंबई

ताशी 180 कि.मी. वेगाने घोंघावणाऱ्या ‘वायू’ चक्रीवादळाने दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्र सुखरूप आहे, मात्र गुजरातमध्ये दाणादाण उडवण्यास सुरुवात केली आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि केंद्रशासित दिव येथे ‘वायू’चा हल्ला आज (दि. 13) होणार असल्याने 10 जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी केला असून 500 गावे रिकामी केली आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. ‘वायू’चा धोका टळला असला तरी महाराष्ट्रात मात्र मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.ॉ

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ मुंबई, कोकण आणि गोवा किनारपट्टीवर आज धडकण्याची शक्यता होती. मात्र ‘वायू’ने दिशा बदलली. गुजरात किनारपट्टीवर सौराष्ट्र, कच्छ आणि केंद्रशासित दिव येथे आज धडकण्याची शक्यता आहे. सध्या गुजरातच्या वेरावळ किनारपट्टीपासून 280 कि.मी.वर ‘वायू’ घोंघावत आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवायू चक्रीवादळाचा मोठा तडाखा गुजरातच्या दहा जिल्ह्यांना बसू शकतो. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जुनागड, गीर, सोमनाथ, अमरेली, भावनगर आणि दीव या दहा जिह्यांतील 60 लाख लोकांना चक्रीवादळाचा धोका आहे, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले.

– सौराष्ट्र आणि कच्छमधील सुमारे 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे, अशी माहिती गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमारे यांनी सांगितले.

– किनारपट्टीलगतचे बंदर आणि विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
– एनडीआरएफची 52 पथके, लष्कराचे दहा कॉलम, हवाई दल, तटरक्षक दलाची पथके तैनात केली आहेत.

– ‘ओएनजीसी’ला हायअलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत वाऱ्याचा वेग…
– वायू चक्रीवादळाने दिशा बदलली तरी वाऱ्याची गती तीव्र होऊन जोरदार पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाच्या मुंबईतील केंद्राचे संचालक विश्वांभर सिंह यांनी सांगितले.

– दुपारी एक वाजल्यापासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. vayu
– चर्चगेट येथे होर्डिंग कोसळून 62 वर्षीय मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू झाला.
– वांद्रे पश्चिम भागातील एसव्ही रोडवर स्कायवॉकच्या पत्र्याची शेड कोसळून दोन महिला जखमी.
– बोर्डी रोड रेल्वे स्थानकानजीक पुलाचे काम सुरू असताना जोरदार वाऱयामुळे पाच गर्डर झुकले. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. चार कामगार किरकोळ जखमी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या