दलिताची अंत्ययात्रा रोखण्याचा उच्चवर्णीयांचा प्रयत्न; पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

75

सामना ऑनलाईन । मेहसाणा

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात एका ४५ वर्षांच्या दलित व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. काही उच्चवर्णीयांनी दलिताची अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडण्यात आले.

मेहसाणामधील एका गावात खोडा रावत नावाच्या दलिताची अंत्ययात्रा पेठा चौधरी आणि लाला चौधरी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. अंत्ययात्रा ज्या मार्गाने स्मशानाकडे जाणार आहे, तो आमचा खासगी रस्ता आहे. त्या रस्त्याने अंत्ययात्रा नेऊ देणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या भूमिकेमुळे गावात तणाव पसरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत चौधरी यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे अंत्यसंस्कारात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिस बंदोबस्तात खोडा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर चौधरी बंधूना सोडण्यात आले. अंत्यसंस्कार करून परतणाऱ्या नागरिकांना अडवून हा आमचा खासगी मार्ग असून येथून जायचे नाही, अशी धमकी चौधरी यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून चौधरी यांना समज द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या