गुजरात : उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा बंडाचा झेंडा

18

सामना प्रतिनिधी । गांधीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निष्ठावान शिलेदार उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हवी ती खाती न मिळाल्यानं ते नाराज असून प्रसंगी राजीनामाही देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पाटीदार नेता हार्दिक पटेलने धूर काढल्यानंतर थोडासा विसावा मिळतो न मिळतो तोच मोदी आणि शहा यांची या दुसऱ्या पटेलांनी झोप उडविली आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि १८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली खरी मात्र अर्थ, नगरविकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्त्वाची खाती न मिळाल्यानं नितीन पटेल चांगलेच भडकले आहेत. पाटीदार पटेलांच्या आंदोलनाने भडकलेल्या पटेलांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्रीपदी नितीन पटेल यांचे नाव भाजपाने सुरूवातीला पुढे आणले. मात्र प्रत्यक्षात विजय रुपाणींना मुख्यमंत्री पद दिल्याने नितीन पटेल नाराज झाले होते. त्यात वित्त आणि नगरविकास ही महत्वाची खाती त्यांना मागूनही मिळाली नसल्याने शुक्रवारी त्यांनी सचिवालयाकडे पाठ फिरवली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभारही स्वीकारला नाही. दोन दिवसांत पक्षाने आपली मागणी पूर्ण न केल्यास उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचा इशारा नितीन पटेल यांनी दिल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या