गुलाबजाम – उत्तम मुरलेला सुखद गोडवा

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

खव्याने गच्च भरलेला तरीही नजरेनेच टिपता येणारा त्याचा रसरशीतपणा, तळणीतनं आलेला हसाहवासा तांबूस लाल खरपूस रंग आणि पाकात राहून फुललेलं अंग आणि त्यात रुजलेला सुखावणारा गोडवा असे गरम गरम गुलाबजाम जेव्हा समोर येतात तेव्हा त्यातनं येणाऱ्या ताजेपणाच्या वाफेत त्याचा गोडूस गंध मिसळलेला असतो आणि त्याचं रूप, स्पर्श, गंध, चव या सगळ्याच पातळ्यांवर तो आपल्याला जिंकून घेतो. अगदी या गुलाबजामच्या सर्वंकष अनुभवाइतकाच सुंदर मुरलाय ‘गुलाबजाम’ हा सिनेमा.

सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘गुलाबजाम’ हा सिनेमा म्हणजे आनंद देणाऱया आणि त्यासोबत जाणिवांना सजीव करणाऱ्या कलाकृतींपैकी एक. त्याच्यामुळे पक्वान्न परिपूर्ण होतं आणि त्याच्या आस्वादानंतर तृप्त व्हायला होतं. खरं तर खाद्य संस्कृती किंवा खाद्य प्रवाहाविषयीचे सिनेमे हे एका चौकटीत बांधलेले असतात. खाद्याचे रंग, गंध, चव इत्यादी गोष्टी उलगडत असताना सिनेमा हा त्याभोवतीच फिरत राहतो. त्यामुळे भले तो क्षणिक आनंद देणारा असेलही, पण त्याला मर्यादा येतात, पण ‘गुलाबजाम’ सिनेमाचं तसं नाही. जरी तो इतिपासून अर्थपर्यंत अगदी स्पष्टपणे खाद्य संस्कृतीभोवती बांधलेला सिनेमा असला तरी त्याच्या मुख्य कथासूत्राच्या आत आणखी एक कथासूत्र आहे आणि जसा तळलेला गुलाबजाम आणि साखरेचा पाक एकमेकांत मिसळल्यावर गुलाबजामला खरं अस्तित्व येतं, तितक्या बेमालूम या दोन्ही गोष्टी एकमेकांत मिसळल्या आहेत. त्यामुळे वाट्याला जो अवीट आनंद येतो तो प्रत्यक्षच अनुभवावा.

ही कथा सुरू होते ती लंडनमध्ये राहणाऱया, इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या एका मराठी, देखण्या मुलापासनं. तो लंडनमधलं आपलं सगळं करीअर सोडून पुण्यात येतो. इथे त्याला अस्सल मराठमोळा साग्रसंगीत स्वयंपाक शिकायचा असतो. तो शिकून परत लंडनला जाऊन मराठी पाककृतींचं हॉटेल सुरू करायचं असतं. त्यासाठी तो शिक्षकाचा शोध घेतो आणि तो शोध घेत असताना त्याची गाठ पडते राधा आगरकर या एकाकी राहणाऱ्या, थोडय़ा विक्षिप्त, अलिप्त अशा स्त्राrशी. तिच्या हातची अप्रतिम चव त्याला तिच्याकडे खेचून नेते. तिच्याकडनं स्वयंपाक शिकायचाच ही खूणगाठ तो मनाशी बांधतो, पण ते वाटतं तितकं सहज नसतं. मग तो ते कसं साध्यं करतो, स्वयंपाकाची एकेक कृती जशी उलगडत जाते तशी आयुष्यंही उलगडत जातात. कधी चरचरीत तडक्यासारखी तर कधी चव आणणाऱ्या गोडव्यासारखी, कधी तिखट आठवणींसारखी… आयुष्यं आणि चवींच्या गोष्टीची ही मेजवानी बहार आणते हे नक्की!

यातलं दिग्दर्शन आणि लेखन अप्रतिम. उगाच आक्रस्ताळेपणा नाही, बेगडीपणा नाही की उगाच अति गोडवा नाही. सगळं प्रमाणात पडलं की, पदार्थ चविष्ट होतो हे या सिनेमाच्या दिग्दर्शन आणि लेखनातनं अगदी तंतोतंत पटतं. भावणारे, कधी निखळ हसू आणणारे, तर कधी चटका लावणारे संवाद, खिळवून ठेवणारी पटकथा आणि व्यक्तिरेखांना, त्याच्या भोवतालच्या वातावरणाला जिवंत करणारं दिग्दर्शन या सगळ्यांमुळे सिनेमा जमून आलाय. काही काही दृष्यं सिनेमा संपला तरी लक्षात राहतात. म्हणजे ती रस्ता क्रॉस करून जातेय आणि एक लहान मुलगी तिच्याकडे भीक मागते, तेव्हा ती स्वतःची पर्स देते. ती मुलगी आपल्याला हवे तितके पैसे काढून घेते आणि पर्स परत करते किंवा तिची बहीण तिला या घरात घेऊन येते तेव्हाचा तिचा आक्रोश, सिनेमा बघताना चेहऱ्यावर उमलणारा आनंद, त्याला घरातनं हाकलवून देताना सहजतेने दिलेली भजी किंवा पदार्थांशी त्याचं असलेलं जिवाभावाचं नातं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि त्यांचा वापर अशी असंख्य दृष्यांची जंत्री पाहताना तृप्त व्हायला होतं.

या सगळ्यांवर साज चढलाय तो छायांकनाचा, ध्वनीचा, संगीताचा आणि अर्थात अभिनयाचा. सिद्धार्थ चांदेकर यांनी रंगवलेला लंडनस्थित तरुण, त्याचं स्वप्न, त्याने जपलेलं मराठीपण हे सगळं अगदी सहज. त्याचं माशांशी, शेंगदाण्याशी गप्पा मारणं किंवा कुठल्याही पदार्थाशी संवाद साधणं अगदी अलगद वाटतं. मुख्य म्हणजे या गमतीतली सलगता अख्ख्या सिनेमाभर राखलीय. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातनं त्याची व्यक्तिरेखा उलगडते आणि सिनेमाची पकड घेत जाते. त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेतली अभिनेत्री किंवा केवळ एका दृष्यापुरती असलेली रेणुका शहाणेंनी रंगवलेली तिची बहीण, आठवणीत रमलेला चिन्मय उदगीरकर किंवा खालच्या मजल्यावरचे आजोबा… सगळे छोटय़ा भूमिकेत असले तरीही या सिनेमाला पूरक ठरतात. सगळय़ात मुख्य बोलायला हवं तर ते राधा आगरकर साकारणाऱ्या सोनाली कुलकर्णीबद्दल. तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलावं तितकं कमी आहे. तिचं स्वयंपाकातलं दैवी कौशल्यं, तिच्यातलं निरागसपण, तिचा विक्षिप्तपणा, तिचं गबाळ्यासारखं राहणं, स्वतःची जाणीव नसणं, तिच्या आत दडलेलं बरंच काही, तिचा भूतकाळ, तिचा वर्तमानकाळ आणि तिचा येऊ घातलेला भविष्यकाळ. खरं म्हणजे तिच्या मध्यवर्ती भूमिकेभोवतीच हा सिनेमा फेर धरतो. अगदी एखाद्या पदार्थातल्या मध्यवर्ती गोष्ट जितकी उत्तम असावी तितकी उत्तम तिने ही भूमिका ठसवली आहे. अर्थात ती लिहिलीदेखील उत्तम गेलीय. तिच्यावर दिग्दर्शकीय संस्कारही तितकेच उत्तम झालेयत, पण ती सहज वठवण्यात सोनाली कुलकर्णीला तोड नाही. राधाचं बावरलेपण असो वा निरागसपणा, तिचे कोरडे डोळे असोत वा तिची चिडचीड, सगळं कुठेही अतिरेक न होता अगदी सहज उभं राहिलंय. अगदी सिनेमाच्या ताठ कण्यासारखं.

या सिनेमाचं छायांकन ही आणखी एक उजवी बाजू. मुळात या सिनेमात एक प्रधान गोष्ट असली तरीही हा खाद्य सिनेमा असल्याची जाणीव शेवटपर्यंत राखलीय. त्यामुळे गबाळ हॉस्टेलमध्ये उघडणारा डबा असो, त्या डब्यातला झुणका, चपाती आणि गुलाबजामची नजरेला जाणवणारी चव असो, मासळी बाजारातली माशांची खरेदी असो, सुरमईचे तुकडे तळण्याचा प्रपंच असो किंवा तिच्या स्वयंपाकघरात सुरू असणारा स्वयंपाकाचा घाट असो, अगदी साध्या अन्न बनवण्याच्या प्रक्रियेतही त्यातल्या मसाल्याचं प्रमाण, त्यातल्या पदार्थांचे रसरशीत रंग, फोडणी, फुगणारा फुलका हे सगळं मनापासनं सुखावून जातं. नंतर वेगवेगळय़ा स्वयंपाकघरांत बनलेले घाट किंवा या मराठी पदार्थांना मिळणारा पाश्चात्त्य साजही नेत्रसुखद. मुळात या पदार्थांचा प्रवास साध्या डब्यातल्या थंड अन्नापासनं ते स्वयंपाकघरात घडणाऱ्या पदार्थांपर्यंत आणि त्या पदार्थांना मिळणाऱया डिझायनर लूकपासनं ते त्याच्या पाश्चात्त्य साजापर्यंत आपल्यासमोर येतो, पण त्याचं मनाला आनंद देणारं रूप मात्र सिनेमाभर तसंच असतं. या सिनेमाचं संगीत आणि ध्वनी यांनीही या सिनेमाची लय तितकीच खुलवली आहे.

एकूणच गुलाबजाम हा पंक्तीतला राजा आहे हे या सिनेमाच्या शीर्षकातनं तर येतंच, पण सिनेमा बघूनही ते मनोमन पटतं. गरज असते ती मनापासनं ही चव घ्यायची. चवीच्या चाहत्या प्रेक्षकांनी या सिनेमाचा आनंद मोठय़ा पडद्यावर नक्की घ्यावा. तरच दर्दी चवीच्या प्रेक्षकांना या पंक्तीचा खरा आनंद लाभू शकेल.

gulabjaam-rating