दुष्काळी उपाययोजना अमलबजावणीत हयगय झाल्यास याद राखा – गुलाबराव पाटील

3

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल आणि जळगाव या तीन तालुक्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले असून शासनाने दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी दिलेल्या 8 मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन प्रशासनाने करून प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी व नागरिकाला लाभ द्यावा अन्यथा प्रशासनाने गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवावे, असा सज्जड इशारा शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री तथा उपनेते नामदार गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव व एरंडोल तालुक्यातील 108 गावे दुष्काळ यादीतून वगळण्यात आली होती. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळ जाहीर करून घेऊ, असे वचन जनतेला दिले होते. दरम्यान विधानसभेत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर सुरु असलेल्या चर्चेमध्ये मंत्रीपदावर असताना देखील हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवाज उठवला होता. तसेच मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून वगळलेल्या गावांचा समावेश करण्यासाठी आग्रह धरला होता. राज्यमंत्री पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन धरणगाव व एरंडोल तालुक्यातील 108 गावांचा यादीत समावेश केला आहे. शासनाने 151 तालुक्यामध्ये तसेच त्या व्यतिरिक्त उर्वरित भागातील 268 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करून उपाययोजना लागू केल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या 3 जानेवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीमध्ये धरणगाव व एरंडोल तालुक्यातील महसूल मंडळातील 108 गावे समाविष्ट करण्यात आले आहेत.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मकरसंक्रांतीनिमित्त शेतकऱ्यांना दिलेली भेट ठरली आहे. जमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोहयोच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी करणे, असे आदेश शासनाने दिले आहेत.

दरम्यान, या सातही महसूल मंडळांमध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ उपाययोजना राबविण्याचे काम प्रशासनाने प्रभावीपणे करावे, असे निर्देश राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक दुष्काळी उपाययोजने पासून वंचित राहिल्यास गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा, असा सज्जड दमही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. नामदार पाटील यांनी दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.