ब्रेकिंग : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा

2

सामना ऑनलाईन । पंचकुला

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिमसह अन्य तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 11 जानेवारी रोजी राम रहिम आणि त्याच्या तीन साथीदारांना रामचंद्र यांच्या हत्ये प्रकरणी कलम 302 आणि 120 अंतर्गत हत्या आणि हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. आज या चारही दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे शिक्षा सुनावली.

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी राम रहिम याच्या डेऱ्यातील अनैतिक व बेकायदेशीर प्रकरणांबाबतच्या बातम्या त्यांच्या ‘पूरा सच’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच्याच रागातून 16 वर्षांपुर्वी 24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने 2007 साली दाखल केलेल्या आरोप पत्रात राम रहिम आणि त्याच्या तीन साथिदारांना आरोपी केले होते.