lok sabha 2019- उत्तर पश्चिमसाठी गुरुदास कामत यांच्या पत्नीचा नकार, काँग्रेसची पंचाईत

सामना प्रतिनिधी, मुंबई

उत्तर पश्चिम मुंबईतून काँग्रेसला अजूनही मातब्बर उमेदवार सापडलेला नाही त्यामुळे काँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे. माजी खासदार गुरुदास कामत यांच्या पत्नी मारुख कामत व मुलगा डॉ. सुनील कामत यांना उमेदवारीबद्दल थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिल्यामुळे कृपाशंकर सिंह, सुरेश शेट्टी यांच्या नावांचा विचार सुरू आहे, पण अजूनही उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही.

आता 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दुर्दैवाने गुरुदास कामत यांचे निधन झाले. त्यामुळे या जागेवर कोणाची उमेदवारी जाहीर करावी यावर काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबईतील उमेदवारांबाबत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली तेव्हा संजय निरुपम, कृपाशंकर सिंह यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले होते, पण संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी देऊ नये असा रेटा काँग्रेसमधील निरुपमविरोधी गटाने लावला आहे. त्यामुळे नक्की कोणाचे नाव निश्चित करावे यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही.

या मतदारसंघातून कृपाशंकर सिंह व सुरेश शेट्टी यांच्या नावाची चर्चा सुरू असताना सोनिया गांधी यांच्या मर्जीतील अहमद पटेल यांनी दिवंगत गुरुदास कामत यांची पत्नी मारुख कामत व मुलगा डॉ. सुनील कामत यांचे नाव सुचवले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी हे एमएमआरडीए मैदानावरील जाहीर प्रचारसभेसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी गुरुदास कामत कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी या मतदारसंघातील उमेदवारीबद्दल चर्चा करताना गुरुदास कामत यांची पत्नी मारुख कामत व त्यांचा मुलगा डॉ. सुनील कामत यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी नकार दिला.

असा आहे मतदारसंघ
उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघात जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांना 2 लाख 81 हजार 792 मते पडली होती. तर शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी तब्बल 4 लाख 64 हजार 820 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला होता.