नमाझ व अझानच्या आवाजावरून वाद; प्रशासनाची मोठी कारवाई, मशिदीला ठोकले टाळे

फोटो - प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

हरयाणाच्या गुरुग्राममध्ये नमाझवरून मोठा वाद सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या वादातून नगर प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मशीद तीन मजली इमारतीमध्ये बनवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनांनी इमारतीमध्ये होणाऱ्या नमाझावरून तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हिंदू संघटनांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या इमारतीतील घराचा वापर मशिदीसारखा करण्यात येत आहे. हे नियमांचे उल्लंघण असून येथे रोज शेकडो लोकं जमा होतात. अझानच्यावेळी होणाऱ्या भोंग्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर कारवाई करताना नगर प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुग्राममध्ये यापूर्वी देखील मोठ्या आजावाने नमाझ पढण्याला नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे प्रचंड वाद झाला होता. अखेर प्रशासनाने नमाझ पढण्यासाठी मुसलमान समाजाला 37 जागांवर परवानगी दिली होती. परंतु त्याला केराची टोपली दाखवत काही भागात इमारतींमध्ये नमाझ पढला जावू लागल्याने नागरिकांनी याची तक्रार केली.