मुद्दा : गार्ड व मोटरमनचे प्रश्न

प्रातिनिधिक

>>गुरुनाथ मराठे<<

गार्डस्चा ओव्हरटाइम करण्यास नकार, पश्चिम रेल्वेचे वाजले तीन तेरा ही बातमी (सामना ३१ जुलै) मध्ये वाचली आणि गार्डची कृती योग्यच वाटली. शासनाने गार्ड लोकांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांना हायसे वाटले असेल. त्याचप्रमाणे रेल्वेने लाखोंनी प्रवास करणाऱ्या जनतेनेदेखील सुटकेचा निश्वास टाकला असेल. जोपर्यंत आपल्या न्याय्य मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गार्ड व मोटरमन यांच्याकडे एकच पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे सरकारला नमविण्यासाठी प्रवासी जनतेला वेठीला वेठीला धरणे. त्याचा कार्यभाग म्हणून सिग्नल यंत्रणा तसेच इतर सर्व यंत्रणा सुरळीत असताना एखाद्या स्थानकावर तसेच दोन स्थानकांच्या दरम्यान बराच वेळ गाडी उभी करून ठेवणे तसेच गाडीचा वेग अतिशय कमी ठेवणे. या सर्व प्रकारांमुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोचण्यास एक तासाऐवजी एक तास वीस- पंचवीस मिनिटे इतका उशीर झाल्यामुळे त्यांना मनस्ताप होतोच शिवाय कार्यालयात लेट मार्क लागतो तो वेगळाच अर्थात याचे संबंधित रेल्वेमंत्र्यांना काहीच देणेघेणे नसते. कारण एक तर त्यांना वातानुकूलित केबिनमध्ये बसायचे असते. दुसरे म्हणजे त्यांना चारचाकीतून किंवा वेळ पडल्यास विमानातून प्रवास करायचा असतो. त्यामुळे ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’. याठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मोटरमन व गार्ड ही रेल्वेच्या रथाची दोन प्रमुख चाके आहेत. त्यापैकी मोटरमनचे काम जास्त जिकिरीचे आणि डोळ्यात तेल घालून करायचे असते. लाल सिग्नल असताना गाडी पुढे जाऊ न देणे, कोणी प्रवासी अथवा गाय-बैल लोहमार्गात आल्यास त्याला शक्यतो वाचवण्याचा प्रयत्न करणे. गार्डलादेखील गाडी प्रत्येक स्थानकात किती वेळ थांबवायची, तसेच सर्व प्रवासी वर चढले ना याची खात्री करून घ्यावी लागते. तेव्हा या अशा अतिरिक्त ताण असलेल्या गार्ड व मोटरमनच्या जागा रिक्त असतील तर त्याजागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करायलाच पाहिजे. तसे न करता आहे जे गार्ड व मोटरमन त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकणे चुकीचे आहे. कारण तीसुद्धा शेवटी माणसे आहेत आपण प्राण्यांनासुद्धा आवश्यक तेवढी विश्रांती देतो. जाता जाता सरकारला एवढेच सांगावेसे वाटते की, रेल्वेचे गार्ड व मोटरमन, अन्नदाता शेतकरी आपल्या सीमेवरील जवान, स्वातंत्रसैनिक ही सर्व व्हीआयपी माणसे आहेत. त्यांच्या मागण्या धुडकावून त्यांची क्रूर थट्टा करू नये.