कॉम्प्लेक्स परिसरात सांडपाण्याची डबकी; १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरात डासांचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्यांवर मालवण पालिकेने कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या उपस्थितीत शनिवारी शहरातील मथुरा कॉम्प्लेक्स येथे करण्यात आलेल्या स्पॉट पंचनाम्यात सांडपाण्याचे भयाण वास्तव समोर आले.

दरम्यान कॉम्प्लेक्स परिसरात सांडपाण्याची डबकी व अन्य ठिकाणी सांडपाणी सोडल्याचे पाहणीत दिसून आले. सांडपाणी सोडलेल्या डबक्यांच्या बाजूला असलेली लोकवस्ती तसेच लहान मुलांचा दवाखाना लक्षात घेता तात्काळ सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना कॉम्प्लेक्स धारकांना करण्यात आल्या असून १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

शहरात सर्वच ठिकाणी धडक तपासणी मोहीम सुरू असून गटारात तसेच घर, हॉटेल अथवा कॉम्प्लेक्स परिसरात उघड्यावर सांडपाणी सोडणार्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल. असे पालिका आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

यापूर्वीही मथुरा कॉम्प्लेक्स मालकाला सांडपाणी सोडल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर पालिकेने शनिवारी स्पॉट पंचनामा केला. यावेळी सांडपाणी उघड्यावरच सोडल्याचे दिसले. या पाहणी दरम्यान नगराध्यक्ष, आरोग्य सभपती यांच्यासह गटनेते नगरसेवक गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेवक यतीन खोत, यशवंत गावकर, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदनिका धारकांना नोटीसा काढणार
कॉम्प्लेक्स परिसरातील सांडपाण्याला सदनिका धारक तेवढेच जबाबदार आहेत. परिसरात सांडपाणी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जात नसेल तर सदनिका धारकांना नोटीसा काढणार असल्याचे नगराध्यक्ष, आरोग्य सभपती यांनी स्पष्ट केले.

५० हजार दंड व फौजदारी कारवाई होणार
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता मथुरा कॉम्प्लेक्स मालकाने तात्काळ सांडपाण्याची व्यवस्था करावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे कॉम्प्लेक्स परिसरात उघड्यावर सांडपाणी दिसल्यास ५० हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी माहिती देताना सांगितले.