आंध्र प्रदेश व ओदीशाला ‘तितली’चा तडाखा, 8 जणांचा मृत्यू


सामना ऑनलाईन । गुवाहाटी

आंध्र प्रदेश व ओदीशाला ‘तितली’ चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळाने 8 जणांचा बळी घेतला आहे. ओदीशातील गोपालपूर येथे मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाल्याने पाच मच्छीमार बुडाले. पण त्यांना वाचवण्यात आले आहे. तर आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात तितली वादळात 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. आंध्र प्रदेश आणि ओदीशामध्ये थैमान घालणारे तितली चक्रीवादळ पश्चिम बंगालकडे सरकत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

ओदीशातील हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 12 तासात येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे. यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओदीशातील गोपालपुरपासून 86 किमी अंतरावर तितलीने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्त्यावर विजेचे खांब व शेकडो अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 18 मदत पथक येथे बचाव कार्य करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन सेंटीमीटर पासून सव्वीस सेमी एवढी पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

गोपालपूर येथे ताशी 140 से 150 किमी वेगाने वादळी वारे वाहत असून येत्या 12 तासात हा वेग ताशी 165 किमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून दोन्ही राज्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.