… कहाणी थेंबाची!

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘एचटूओ ’ म्हटले की सर्वात आधी समोर येते ते म्हणजे पाण्याचे सूत्र. कारण पाण्याला वैज्ञानिक भाषेत ‘एचटूओ’ ने संबोधले जाते. पण आता ‘एचटूओ’ या हटके नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. या पोस्टरमध्ये ‘एचटूओ’ या चित्रपटाच्या नावासोबतच ‘कहाणी थेंबाची’ अशी टॅगलाईन देखील आहे. संपूर्ण कोरड्या आणि तडे गेलेल्या जमिनीवर पाण्याचे मोजकेच थेंब दिसत आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाण्यावर भाष्य करणारा असू शकतो. शिवाय या पोस्टरमध्ये एका पायात बूट तर एका पायात चप्पल घातलेल्या व्यक्तींचे पाय दिसत आहे. यावरून हा सिनेमा दोन भिन्न विचार असलेल्या व्यक्तींवर आधारित असावा असे वाटते. मिलिंद पाटील दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती सुनील झवर यांनी केली असून जी. एस. फिल्मस् निर्मित हा सिनेमा 12 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.