तुम्हाला माहीत आहे नखं का खातात?

58

<<डॉ. नेहा सेठ>>

नखं कुरतडण्याची सवय… लहानांपासून मोठय़ांपर्यंत बऱयाचजणांना असते. मानसिक एकटेपणामुळे ही सवय जडू शकते. विशेषतः लहान वयात मुलांना नखं कुरतडणे, अंगठा चोखणे अशा विचित्र सवयी लागतात. मुले अनुकरणप्रिय असल्याने काही वेळा दुसऱयाला बघून किंवा कुटुंबात कोणाला तरी सवय असत, म्हणून ही सवय लागू शकते. काही मुलं एकलकोंडी, असुरक्षित असतात. त्यांना सतत टोमणे ऐकावे लागतात, तर काहींचा आत्मविश्वास कमी असतो. अशा मुलांना ही सवय लवकर जडते. नखं कुरतडणं… नखं खाणं… ही अनेक वाईट सवयींपैकी एक सवय. याचा संबंध थेट आपल्या मानसिकतेशी लागतो. या सवयीचे मुख्य कारण म्हणजे मानसिक ताण.

मानसिक कमकुवतपणामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची कृती होत असते. काही जणांना असे केल्याने रिलिफ मिळतो. तर काही लोकांची एकाग्रता यावर अवलंबून असते. नखं कुरतडत असतानाही स्वतःचे काम काही व्यक्ती, मुले एकाग्रतेने करतात. अगदी मोठय़ा पदावरच्या व्यक्तींनाही अंगठा तोंडात घालणे, नखं कुरतडण्याची सवय असते. बहुतेक वेळा ही सवय लहानपणापासूनच जडलेली असते.

पचनसंस्थेवर परिणाम

नखं कुरतडण्याबरोबरच काहीजणांना ती खाण्याची तसेच आजूबाजूची चामडी खाण्याचीही सवय असते. त्याबरोबरच त्याच्यातील मळ, जंतूही पोटात जातात. याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. पोटात दुखणे, अपचन अशा समस्या यामुळे निर्माण होतात. या सवयीमुळे हात सतत ओले राहतात. मग तेच हात सगळीकडे लावले जातात, उदा. कोणाला काही वस्तू देताना, खाद्यपदार्थ देताना वापरले जात असतात. त्यामुळे इतरांनाही आपली किळस येते.

नखे कुरतडण्यावर उपाय

  • अशा व्यक्ती, मुलांना या सवयीमुळे होणारे अपाय समजावून सांगणे, नखांतील घाणीबद्दल सांगायचे.
  • नखे न कुरतडल्याने हात सुंदर दिसतात अशी सकारात्मक मानसिकता मुलांमध्ये निर्माण करणे.
  • कधी कधी मऊ नखे कुरतडणे मुलांना सहसा आवडत नाही. म्हणून नखांना तेल लावून ठेवायचे.
  • नखांना कडू औषध लावणे, चिकटपट्टी लावणे असे उपचार करू नयेत. त्यामुळे नखं कुरतडण्याची सवय वाढू शकते.
  • ‘नखं कुरतडली नाहीस तर तुला पारितोषिक देऊ’ असे सांगून सवयीपासून परावृत्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • होमिओपॅथीमध्ये नखं कुरतडणे, बोट तोंडात घालणे अशा सवयींवर औषधे आहेत. ही औषधे मनावर परिणाम करतात.
  • शिस्त लावण्याकरिता जागरूक करणं आणि सवयीचे तोटे सांगणे महत्त्वाचे ठरते.
  • मोठय़ा व्यक्तींना चारचौघांत मिसळल्यानंतर आपण नखं खात आहोत हे लक्षात आले की, ते लगेच थांबवा.
  • स्वतःच्या मनाला सतत सांगा की, ही सवय चांगली नाही. मला ही सवय सोडायची आहे आणि त्याप्रमाणे कृती करा.

समाजावर होणारा परिणाम

समाजात वावरताना अशा व्यक्तींना पाहिले की, त्यांना कसला तरी ताण आहे हे लगेच लक्षात येते. नखं कुरतडणाऱया व्यक्तीचे मन अस्वस्थ आहे, ती शांत मनाने समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही असे समोरच्याचे त्या व्यक्तीविषयी मत बनते जे अतिशय वाईट आहे. कार्यालयात, मुलाखतीच्या वेळी किंवा समाजात इतर ठिकाणी वावरताना या सवयीमुळे इतरांचे अशा व्यक्तींविषयीचे मत बदलते. समाजात अशी माणसे नकोशी वाटतात. त्यामुळे या सवयीपासून कायमचे दूर जाण्यासाठी स्वतःच स्वतःला शिस्त लावणे महत्त्वाचे आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या