टाळी : एक व्यसन!

jyotsna-gadgil>> ज्योत्स्ना गाडगीळ

ट्रेनच्या प्रवासात बायकांच्या गप्पांना उधाण आलेलं असतं. एकाच वेळी अनेक रेडिओ स्टेशन सुरू असल्याचा फिल येतो. ज्या गप्पांमध्ये आपल्याला रस नसतो, त्या आपल्यासाठी केवळ गोंगाट असतात. ह्यावर उतारा म्हणजे हेडफोन लावायचे, गाणी सुरू करायची आणि जगाला विसरायचं! असं केल्याने कानांवरचे अतीक्रमण थांबवता येते, पण डोळ्यांचे काय? ते किती वेळ बंद ठेवणार? बकध्यान लावायचं ठरवलं, तरी अमुकेक वेळानंतर डोळे उघडावेच लागतात. मग दिसू लागतात अनोखी दृश्य! म्यूट केल्यावर टीव्ही वाहिन्या दिसतात, तसं समोरचं चित्रं दिसू लागतं. काय काय दिसतं? प्रत्येक विषय स्वतंत्र लेखाचा आहे, पण आज नजरेस पडलेली, नव्हे नजरेस खुपणारी गोष्ट म्हणजे एका मुलीचा टाळीसाठी वारंवार पुढे येणारा हात! ही लकब असणारी माझ्या पाह्ण्यातली ती पहिली मुलगी नव्हती, परंतु आजवर टाळी मागणारे चेहरे सलग इतका वेळ मी सहन केले नव्हते, ते आज तिच्यामुळे करावे लागले. गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये दुसरा ऑप्शन नव्हता, मग काय, तिच्या निमित्ताने समस्त टाळेकरींचा समाचार घ्यायचा ठरवला.

वाक्याच्या पूर्णविरामाआधी तिचा सारखा वर येणारा हात पाहून मलाच एवढे इरिटेट होऊ लागले, तर टाळी देणाऱ्या मैत्रिणीची काय अवस्था झाली असेल, ह्याचा विचार करा. बोलता बोलता टाळी मागण्याची लकब असणारी एक तरी व्यक्ती आपल्या सर्वांच्या परिचयात असतेच. बरं, अशा व्यक्तींचं एका टाळीवर भागत नाही, अशा लोकांसाठी आपल्याला हात अधांतरीच ठेवावा लागतो. त्यातले काही जण वाक्य पूर्ण होण्याच्या आतच टाळी घेण्यासाठी हात वर करतात, तर काही जण वाक्य पूर्ण होताच, ‘दे टाळी’ म्हणत हक्काने टाळी मागून घेतात. टाळी हा हक्क नसून ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, हे कोणी सांगा रे ह्यांना!

दोन-पाच वर्षांपूर्वी एका गाण्याच्या कार्यक्रमातील निवेदिकेने समस्त निवेदकांना एक वाईट सवय लावली, ‘एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत’ असे म्हणत प्रत्येक व्यक्तीसाठी टाळी बडवण्याचे काम श्रोत्यांना नाखुषीने करावे लागे. तेच अनुकरण घरगुती समारंभापासून ते शासकीय कार्यक्रमांपर्यंत होऊ लागले. प्रेक्षक किंवा श्रोते, हे स्वानंदासाठी कार्यक्रमाला उपस्थित असतात, टाळ्या वाजवण्यासाठी नाहीत, हे जणू काही निवेदकांच्या ध्यानी मनीच नसते.
एखादी गोष्ट आवडली, तर दाद देण्यासाठी आपण टाळी वाजवतो, आनंद व्यक्त करण्यासाठी टाळी वाजवतो, ठेका धरण्यासाठी टाळी वाजवतो. त्यात उत्स्फूर्तता असते. कोणासाठी आपण उत्स्फूर्तपणे टाळी वाजवतो ती त्या कलाकारासाठी दाद असते . मात्र अनेक कलाकार ह्या टाळीचे गुलाम बनतात. त्यांना टाळीचे व्यसनच लागते! योग्य वेळी अपेक्षित टाळी मिळाली नाही, की कलाकाराचा अपेक्षा भंग होतो, तो अस्वस्थ होतो. मग टाळी मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतो. व्याख्याते तर टाळ्यांची वाक्यच पाठ करूनच येतात म्हणे! एवढंच काय, तर आपल्या वाक्याला टाळी देणारे स्तुतीपाठकही त्यांना जवळचे वाटतात. टाळीचे वाक्य फेकताना अशा व्याख्यातांचा टार्गेट ऑडिअन्सही ठरलेला असतो. एकेकाळी टाळ्यांचा कडकडाट ऐकलेला कलाकार उतारकाळातही टाळ्यांसाठी आसुसलेला असतो. टाळ्यांची गुंज त्याच्या कानात घुमत राहते.

टाळी मिळवण्यासाठी अर्थात कौतुकाचा वर्षाव होण्यासाठी लोक जिवाचं रान करतात. टाळी मिळवण्यासाठी दिलेली ही झुंज समजू शकतो, परंतु हे बळेबळे टाळी प्रकरण कुठे तरी थांबायला हवे, असे वाटत नाही का?
हा सगळा विचार करत असताना माझी नजर त्या मुलीवर स्थिरावलेली. तिनेही मला पाहिलं आणि गप्पांमध्ये सामील करून घेत हात पुढे करत म्हणाली, ‘दे टाळी…’
लगेच माझं स्टेटस मनोमन अपडेटेड …..फीलिंग इरिटेटेड!

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]