केसांचा रंग, कशी घ्याल काळजी…

>>ओंकार चव्हाण, हेअर आर्टिस्ट

आजकाल केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढतंय. यामागची कारणे म्हणजे ताणतणाव, आहार आणि प्रदूषण. सध्याच्या दगदगीच्या युगात ताण घेतल्याने केस पांढरे होणे हे मूळ कारण मानले जाते. आहारातील बी १२ हे प्रथिन कमी झालं तर केस पांढरे होऊ शकतात. मांसाहारी पदार्थांमध्ये हे प्रथिन प्रामुख्याने आढळते. शिवाय महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीतील गुणसूत्रे… म्हणजे आईवडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर मुलांचेही होऊ शकतात. त्यामुळे मेंदी लावावी की हेअर कलर वापरावा असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

हल्ली वाढत्या वयाच्या आधीच केस पांढरे होऊ लागले आहेत. शरीराला मिळणाऱ्या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काही वेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात. डोक्याच्या त्वचेमध्ये मेलाफिस्ट असते. जे केसांच्या मुळाशी असते. त्यामुळे मेलानिनची निर्मिती होते. मेलानिन दोन प्रकारचे असतात. यावर केसांचा रंग अवलंबून असतो. मेलानिनचे प्रमाण वाढते वय, शरीराला आवश्यक ती प्रथिने न मिळणे इत्यादी कारणांमुळे कमी होते. त्यामुळे एक एक केस पांढरा होत जातो.

मेंदी वापरावी की केसांचा रंग

केसांना मेंदी लावली की ते लाल दिसतात. मेंदीचे मिश्रण संतुलित नसेल तर केस शुष्क होणे आणि पांढरे होण्याचे प्रमाण वाढते. मेंदी लावल्यामुळे केसांचे वजन वाढते. त्यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो.

मेंदी लावल्यावरही केस पांढरे होऊ शकतात. केस पांढरे होण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते. केसांमध्ये ती ८-१५ दिवस राहते. तिचं केसांवर एक आवरण तयार होतं. मेंदीचा केसांना वासही येतो.

सध्या बाजारात वेगवेगळे हेअर कलर मिळतात. केसांना रंग लावणे सोयीचे… कारण रंग केसांच्या मुळांशी जाऊन मेलानीनचं काम करतं. मुळाच्या वरच्या केसांचा रंग बदलतो. यामुळे केस गळण्यावरही परिणाम होत नाही.

रंगामुळे केस पांढरे होतात का?

 रंग लावल्यावर केस पूर्णतः काळे दिसू लागतात, पण जेव्हा त्याचा रंग निघून जातो तेव्हा केस पांढरे दिसू लागतात, मात्र लोकांना वाटते की, सगळेच केस पांढरे होत आहेत, मात्र असे नसते. त्याऐवजी रंग लावल्यामुळे असे होण्याचे खूपच कमी असते. म्हणून रंग लावल्यामुळे केस पांढरे झाले, असे होत नाही. शिवाय हेअर कलर केस धुतल्यानंतर निघून जातो.

थंडाव्यासाठी मेंदी

केसांना मेंदी लावणे हा आयुर्वेदिक उपाय आहे. मेंदी डोकं शांत  ठेवण्याचं काम करते. घरगुती आपण अंदाजानेच मेंदीमध्ये वनौषधी टाकतो. पण हे प्रमाण संतुलित नसेल तर केसांसाठी ते अपायकारक ठरू शकते. जास्त काळ साठवून ठेवलेल्या वनौषधी वापरू नका. कारण त्या केसांना अपायकारक ठरू शकतात.