रुबाबदार पांढरे केस

4

>>ओमकार चव्हाण, हेअर एक्सपर्ट

काळय़ाभोर केसात रुपेरी छटा म्हणजे वय होणं ही जुनाट संकल्पना कधीच मागे पडली आहे. त्यामुळे आजीआजोबांनाही आपले नैसर्गिकरीत्या पांढरे झालेले केस छान रुबाबदार ठेवता येतात.

काळ्याभोर  केसांमध्ये अचानक रुपेरी छटा डोकावणे ही आजच्या काळातील एक आम बाब. बरेच आजी-आजोबा विनाकारण या पांढऱ्या केसांनी अस्वस्थ होऊन लगोलग केसांना कृत्रिम रंग लावू पाहतात. पण मुळात एवढे अस्वस्थ होण्याचे काही कारणच नाही. पांढऱ्या केसांचा स्वतःचा असा एक रुबाब असतो. परिपक्वता असते. शांत, समजूतदार सौंदर्य असते. त्यामुळे उगाच कृत्रिम काळा रंग केसांना लावण्याऐवजी रुपेरी छटा मस्त अभिमानाने मिरवा.

कुटुंबाची जबाबदारी, प्रवास, मानसिक ताणतणाव, प्रदूषण यामुळे केस लवकर पांढरे होतात. डोक्यावर सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पांढरे केस असतील तर ते छान दिसतात, हे प्रमाण कमी असेल तर काळ्या-पांढऱ्या केसांची रंगसंगती तितकीशी चांगली दिसत नाही. म्हणून त्यांना रंग दिला जातो. एक तर संपूर्ण काळा किंवा सोनेरी, पूर्ण पांढरा किंवा दुसरा कोणताही रंग अशा वेळी केसांना देता येतो. सध्या बाजारात काळे केस पांढरे करण्याचा ट्रेंडही सुरू आहे. ऍश किंवा व्हाईट कलर हायलाइट्स दिला जातो. पांढऱ्या केसांवर हवी ती स्टाईल करता येते.

स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात उठावदारपणा आणण्यासाठी पांढऱ्या केसांना कोणताही प्रकारचा रंग न देता आजी-आजोबा त्यांच्या आवडीनुसार हेअर स्टाइल करू शकतात. तात्पुरती पांढरी शेड केसांना देता येते. कमी झालेली प्रतिकारशक्ती, औषधांचे दुष्परिणाम, थायरॉईड, मधुमेह, रक्तदाब यांचा केसांवर परिणाम होतो. त्यामुळे नेहमीची औषधे घेत असतानाही आहारात ब, क, ई युक्त पदार्थ यामध्ये लिंबूवर्गीय फळे, शेंगावर्गीय भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, शहाळे यांचा समावेश करावा.

वाढते वय आणि केसांची निगा 

> पुरेशी झोप घ्यावी. त्यामुळे मेंदू व शरीराला विश्रांती मिळते.

> मानसिक ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

> आठवडय़ातून दोनदा केसांना तेलाने मसाज करावा.

> केस वेळेवर स्वच्छ न धुतल्यास त्यात घाम, धूळ अडकते. त्यामुळे रंध्रे मोकळी न राहता बंद होतात. केसांची चमक कमी होते. कोंडा होतो, खाज येते, गाठी येतात. यासाठी केस नेहमी स्वच्छ धुवावेत.

पांढऱ्या केसांचा हेअर कट

वयोमानानुसार लांब केस सांभाळणे जड जाते. ते नियमित धुणे, त्यांना मसाज करणे, तेल लावणे जमतेच असे नाही. अशा वेळी केसांची काळजी घेण्याकरिता चेहऱ्याला शोभेल असा हेअरकट आजी करू शकतात. यामध्ये यू कट, ब्लंड कट, शोल्डर कट, बॉय कट असे केशरचनेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे केसांची निगा राखणेही सोपे जाते. छोटय़ा केसांचा छान पिन लावून पॉनिटेलही बांधता येतो किंवा ते मोकळे सोडून स्वतःला स्मार्ट लूकही मिळतो.

केसांची फॅशन करताना… 

> संपूर्ण पांढरे केस असल्यास ठराविक केसांची बट पांढरी ठेवून इतर केसांना वेगळा रंग देता येतो. यामुळे स्वतःला एक नवा लूक मिळेल.

> पॉनिटेल, स्ट्रेटनिंग किंवा आवडत असल्यास जुन्या फॅशनप्रमाणे वेणी अशा सर्व प्रकारची केशरचना काळ्या रंगाप्रमाणे पांढऱ्या रंगावरही करता येतात.

> काही जण काळ्या केसांना पांढरा रंग देऊन हेअर स्टाईल करतात. असे असले तरी सध्या हिंदुस्थानातील फॅशनचा विचार करता लोकांना पांढऱ्या केसांची फॅशन करायला आवडतेच असे नाही.

> परदेशात पांढऱ्या केसांची खूप क्रेझ आहे. काही गुजराती लोकही पांढऱ्या केसांची फॅशन करणे पसंत करतात.

> काही जणांना स्वतःच्या केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या शेडस् वापरण्याची सवय असते. यामुळे चारचौघांत उठून दिसावे हाच उद्देश असतो