हलाल! मुस्लिम समाजाचे दाहक वास्तव

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘हलाल’ या चित्रपटाची कथा पूर्णतः कुराण आणि इस्लामी शरीयतच्या विरोधात असल्याचे सांगत काही मुस्लिम संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. उलट या चित्रपटात मुस्लिम समाजातील ‘हलाला’ पद्धतीचे दाहक वास्तव मांडण्यात आले असून या चित्रपटाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे राज्य मुस्लिम खाटीक सेवा संघटनेचे जाहीर केले आहे.

इस्लामिक (हदीस) शरीयतीनुसार तीन तलाक, हलाला हे कायदे प्रचलित आहेत. हलाला म्हणजे एखाद्या पुरुषाने काही कारणाने अथवा रागाच्या भरात आपल्या पत्नीला तलाक दिला आणि त्या पुरुषाला पुन्हा त्याच महिलेसोबत संसार करायचा असेल तर त्या महिलेला आधी रितसर दुसऱ्या पुरुषाशी विवाह करावा लागतो. त्या पुरुषासोबत तलाक घेऊन मगच पुन्हा पहिल्या पतीशी संसार करण्याची मुभा असते. पत्नीला तलाक देताना होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता पुरुषाच्या मनात तलाक घेण्यापूर्वी भीती राहावी या उद्देशाने हा कायदा पाळला जातो, अशी माहिती मौलाना निस्सार यांनी दिली आहे. राज्यात ‘हलाला’विषयी चुकीची माहिती देऊन मुस्लिम महिलांची घोर फसवणूक केली जाते. आजही हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या चित्रपटाला विरोध करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

‘हलाला’विषयी खऱ्या अर्थाने प्रबोधन होईल
या चित्रपटामुळे ‘हलाला’विषयी मुस्लिम समाजाचे खऱ्या अर्थाने प्रबोधनच होईल. उलट एखादा मुस्लिम तरुण पत्नीला तलाक देताना दहा वेळा विचार करेल, असे मत राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संघटनेचे हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले. मुस्लिम समाजाबाबत चित्रपटात काही आक्षेपार्ह विधाने असतील अथवा चुकीचे चित्रीकरण असेल तर ते वगळून चित्रपट प्रदर्शित करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
तिहेरी तलाख पद्धतीवर हिंदुस्थानात बंदी असूनही त्यासंदर्भातील आशय आगामी ‘हलाल’ या मराठी चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या चित्रपटावर स्थगिती देण्यास नकार दिल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.