हाताला बसवला पायाचा अंगठा!

सामना ऑनलाईन । कॅनबेरा

अवयव प्रत्यारोपणाबाबत आपण दररोज ऐकतो. ज्या अवयवांना पर्याय उपलब्ध नसतात, त्यांच प्रत्यारोपण करणं जवळजवळ अशक्य असतं. पण, हाताचा अंगठा तुटला म्हणून पायाचा अंगठा बसवल्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का? ऑस्ट्रेलियातल्या डॉक्टरांनी ही किमया करून दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियातील २० वर्षीय झॅक मिचेलच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला, आणि आश्चर्य म्हणजे डॉक्टरांनी चक्क त्याच्या उजव्या पायाचा अंगठा काढून तो हातावर प्रत्यारोपित केला. झॅकचा पायाचा अंगठा हाताला जोडण्यासाठी तब्बल आठ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. झॅक शेतात काम करत असताना, बैलाने त्याला ठोकर मारली. यात झॅकचा उजव्या हाताचा अंगठा तुटला. त्याच्या मित्रांनी अंगठा लगेचच बर्फाच्या ‘ट्रे’मध्ये ठेवून त्याला डॉक्टरांकडे नेलं, पण अंगठा काही वाचू शकला नाही.

हाताच्या तुटलेल्या अंगठ्याच्या जागी पायाचा अंगठा प्रत्यारोपित करण्यास झॅक तयार नव्हता. पण, डॉक्टरांनी समजावल्यानंतर तो शस्त्रक्रियेसाठी तयार झाला. झॅकवर उपचार करणाऱ्या प्लॅस्टिक सर्जन सेन निकलिन यांच्या म्हणण्याप्रमाणे, “पायाचा अंगठा काढून हाताला जोडणे ही एक विचित्र कल्पना वाटेल. पण, हाताची चार बोटं जरी व्यवस्थित असली, तरी अंगठा नसेल तर अनेक गोष्टी करण्यात अडथळा येतो. त्यामुळे अशी जोडणी करणं भाग होतं. तसंच झॅकच्या कुटुंबीयांना त्याच्या शरीराच्या इतर कुठल्याही अवयवांना आता इजा झालेली नको होती.” या शस्त्रक्रियेनंतर पुढील १२ महिने झॅकला काळजी घ्यावी लागणार आहे. पण, झॅक पुन्हा कामावर रुजू होण्यास उत्सुक आहे.