मातीच्या पणत्या आणि केरसुणीला दिवाळीत का आहे विशेष महत्त्व

संजीवनी धुरी-जाधव

मातीचे दिवे, केरसुणी, रांगोळी या गोष्टी म्हणजे दिवाळीचा आत्मा. शिवाय या साऱ्यांचा संबंध थेट लक्ष्मीशी. या साऱ्यातून माणसाची कलात्मकता प्रगटते…

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि रोषणाईचा सण. दिवाळीत विविध रंगात रंगवलेले दिवे, पणत्या पाहायला मिळतात. खरे पाहता दिवाळी हा दिव्यांचा सण. यावेळी घराबाहेर दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते. बाजारात सध्या विविध आकारात, रंगात आणि कलात्मक पद्धतीचे दिवे पाहायला मिळत आहेत. पण सायनच्या सुकन्या नाईक या विद्यार्थिनीने दिवाळीसाठी कलात्मक पद्धतीने खास दिवे तयार केले आहेत. सध्या तिच्या दिव्यांना सोशल साइट्सवरून वाढती मागणी आहे.
सुकन्या नाईक ही माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. यंदा ती कला शाखेच्या अखेरच्या वर्षाला आहे.

हस्तकौशल्याकडे लहानपणापासूनच ओढा असल्याने काहीतरी नवीन गोष्टी तयार करून मित्र-मैत्रिणींना त्या भेट म्हणून द्यायच्या हा तिचा छंद. अशाच छंदातून तिने गेल्या वर्षी दिवे तयार केले होते आणि तिचे ते दिव्यांवरचे सुंदर हस्तकौशल्य अनेकांना आवडले. तिने विविध प्रकारच्या, आकाराच्या, रंगांच्या आणि कलात्मक पद्धतीने सजवलेल्या पणत्या तिच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना दिवाळी भेट म्हणून दिल्या होत्या. बाजारी भेटवस्तूंपेक्षा हाताने तयार केलेल्या वस्तू दिल्या की त्याची वेगळी गंमत असते. ते करताना आनंद मिळतो हे खरं असलं तरी ही कलाकृती चांगली व्हावी यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. पण ज्याला ही वस्तू भेट म्हणून देतो त्याला मात्र ती कायम लक्षातही राहते आणि आपल्याला आनंद होतो तो वेगळाच. इतके सुंदर दिवे तयार करतेस, तर मग त्याची विक्री का करत नाहीस? लोकांना ते नक्की आवडतील असा सल्ला तिच्या आकर्षक पणत्या पाहून मित्र-मैत्रिणींनी दिला आणि प्रोत्साहनही दिले. विविध आकाराच्या, रंगांच्या अशा आकर्षक कलाकृतीत या पणत्या तयार केल्या आहेत. या पणत्या तयार करण्यासाठी तिने आई-बाबांकडून पैसे घेतले आणि या छोटेखानी उद्योगाचा श्रीगणेशा केला. पण या सगळ्यात सोशल साइटस्चा तिला फार मोठा उपयोग झाला.

तिने तयार केलेले आकर्षक दिव्यांचे फोटो तिने सोशल साइटस्वर शेअर केले होते. आश्चर्य म्हणजे या फोटोंना केवळ लाइक्सच मिळाले नाहीत, तर तिला ३५ ते ४० ऑर्डर्सही मिळाल्या. एवढंच नाही तर एका शाळेत मुलांना असे दिवे शिकवण्याचीही तिला ऑफर आली आहे. पैसे तर कमावलेच पण सुकन्याला त्यातून प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. आपल्या हातच्या कलेचा सदुपयोग झाला, लोकांना ते आवडतंय त्यातच तिला समाधान आहे. दिवाळीला ही भेटवस्तू म्हणून देण्यासाठी चांगला पर्याय आहे. यातून जमा झालेली रक्कम तिची पहिली कमाई तिच्या आई-बाबांना देणार आहे. मातीचे हे दिवे हवे असल्यास सुकन्याशी ७०२१९५३०९८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

केरसुणीचे महत्त्व  

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घरात नवी केरसुणी विकत घेतली जाते. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. घरातील केरकचरा काढल्यावर घराचे पावित्र्य टिकून राहते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.

लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तसेच व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध

केरसुणीला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो असे समजून आपण केरसुणीच्या लगेच पाया पडतो. कचरा हे घरातील दारिद्रय़ आहे, केरसुणी ही घरातील कचरा रूपातले दारिद्रय़ साफ करते. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मीचा अधिवास असतो. त्याच घरात सुखशांती राहते. याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते. तेथे नेहमी पैशाची चणचण भासते. म्हणून घर नेहमी निटनेटके, आवरलेले आणि स्वच्छ ठेवावे. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. केरसुणीचे काम झाल्यावर त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. तसेच त्या केरसुणीला कोणाचा पाय लागणार नाही याचीही काळजी घ्यावी. चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी. केरसुणी कधीही उभी ठेवू नये. घरात नवीन केरसुणी आणल्यावर त्याला आधी हळद-कुंकू लावावे. तसेच शक्यतो शनिवारच्या दिवशी नवी केरसुणी वापरायला काढावी. घरात पैशाची कमी भासणार नाही.