लोकं म्हणतील हरभजन, कुंबळे आणि तेंडुलकरही ‘तसेच’ होते! पांड्या-राहुल वादावर हरभजनचा संताप

58

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर हरभजननेही ताशेरे ओढले आहेत. हार्दिक आणि राहुल यांनी अशा प्रकारची वक्तव्यं करून हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची प्रतिष्ठा पणाला लावली असल्याची खरमरीत टीका हरभजन सिंग याने केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजनने पांड्या आणि राहुलच्या विधानांमुळे हिंदुस्थानी क्रिकेट संस्कृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असल्याचं म्हटलं आहे. आपण अशा प्रकारची वक्तव्यं खासगीत आपल्या मित्रांसमोरही करत नाही आणि त्यांनी तर सार्वजनिकरित्या अशी विधानं केली आहेत. आता लोकं असाही विचार करतील की, हरभजन सिंग सुद्धा असाच होता, अनिल कुंबळे आणि अगदी सचिन तेंडुलकरसुद्धा अशाच मानसिकतेचे होते.

कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये पांड्या आणि राहुलला करणने आपल्या सहकाऱ्यांच्या खोलीतही कुणासोबत शरीरसंबंध ठेवले आहेत का, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यावर दोघांनीही होकारार्थी उत्तर दिलं होतं. त्यावरही हरभजनने कडाडून टीका केली आहे. ”पांड्याला संघात येऊन असा कितीसा वेळ झाला आहे, जो इतक्या अधिकारवाणीने तो संघातील संस्कृतीबद्दल असं बोलू शकतो.”, असा सवाल हरभजनने उपस्थित केला आहे.

बीसीसीआयने केलेल्या निलंबनाविषयी बोलताना हरभजन म्हणाला की, जे झालं ते अतिशय योग्य झालं आहे. बीसीसीआयने त्याचं निलंबन करणंच योग्य होतं. मला याच निर्णयाची अपेक्षा होती. आपला संताप व्यक्त करताना हरभजन म्हणाला की, त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिल्यानंतर मला असं वाटतं की, हे दोघेही समजा एखाद्या बसमधून जात असतील तर त्या बसमध्ये मी माझी पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत चुकूनही प्रवास करणार नाही.” अशा शब्दांत हरभजनने आपला संताप व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या